1

नाती



नाती ....
 किती सोपे शब्द आहेत नाती! पण आपले जीवन अपूर्ण आहे या शब्दांशिवाय. दिवसातून म्हणण्यापेक्षा प्रत्येक तासाला आपण हेच शब्द जगात असतो. आपल्या जन्मापासून जी सुरुवात होते ती आपले जीवन संपले तरी हा शब्द आपली पाठ सोडत नाही. पण आता खरंच विचार करण्याची वेळ आली आहे, आपण खरंच जगतो का हा शब्द? काहींचे म्हणण्यापेक्षा सर्वांचे उत्तर हो हेच असणार आहे. कारण आपण या शब्दअगोदर खूप शब्द जोडले आहेत आणि या शब्दांच्या खेळात आपण आपल्या मनाचे समाधान करत असतो. उदा. मैत्रीचे नाते, विश्वासाचे नाते.. इ.
    प्रत्येकाने आपल्या परस्पर सोयीने नाती या शब्दाची व्याख्या केली आहे आणि आपण तीच जगत आहोत. पहा आठवून ३०-४० वर्षांपूर्वी आपण कधी मैत्रीचे नाते, विश्वासाचे नाते असे रोज बोलत होतो का? तर नाही. आई, पप्पा, बहीण, भाऊ, आजी, आजोबा कितीतरी नाती आपणाला आपल्या समाजाने दिली आहेत त्यांनाच आपण नातलग म्हणत असू, आणि याच नात्यातून निर्माण होणाऱ्या नवीन नात्यानं आपण दूरचे नातलग म्हणत असू आणि म्हणतो हि. आता या युगात हीच  नाती आपल्यात फार राहिली नाहीत आणि ती पोकळी भरून काढण्यासाठी आपण आपल्या सोयीप्रमाणे नवीन नाती निर्माण केलीत. का आली आपल्यावर हि परिस्थिती?
    आजच्या धावपळीच्या युगात आपल्याजवळ जर कशाची कमी असेल तर ती आहे वेळेची. आपण इतके पैशाच्या मागे वाहवत गेलो आहोत कि त्याच्यापुढे सर्व नातीगोती आपण विसरत आहोत. मग आपणाला केव्हा आठवतात आपले नातलग?
जर कोणाला देवाज्ञा झाली कि आपणाला सर्व म्हणजे जवळचे आणि दूरचे असी सगळेच आठवतात.
सुखाच्या वेळी फक्त काही जवळचे आणि मैत्रीचे नातलग आठवतात.
आणि ज्यांना आपण सख्खे म्हणतो म्हणजे भाऊ, बहीण हे फक्त आणि फक्त प्रॉपर्टीच्या हव्यासापोटी आठवतात. आणखी यांची गरज पडते ती लग्न जमवताना. यांचा संदर्भ नाही दिला तर समोरचे राहू दे  आपण तरी ठेवू का त्या माणसांच्यावर विश्वास?

आजकालच्या शहरातील आणि काही गावाकडील मुलांनासुद्धा प्रश्न पडतात मावशी म्हणजे काय? मामा कोण असतो? चुलत भाव, मावस भाव , इ ..हि वेळ आपणावर कोणी आणली? याला सर्वस्वी आपणच जबाबदार आहोत कारण प्रॉपर्टीच्या, पैशाच्या हव्यासापोटी आपणच हे नाती तोडली आहेत आणि तोडत आहोत. पैश्यापेक्षा नात्यांना किंमत देणे महत्वाचे आहे पैसे येतील आणि जातील पण तुटलेली नाती जोडता येत नाहीत. पैश्याने नाती विकत घेता येत नाहीत पण नात्यांनी पैसे उभे केले जाऊ शकतात. थोडक्यात काय तर हरवलेल्या वस्तू पुन्हा विकत घेता येतात पण आयुष्यात हरवलेली नाती पुन्हा हाताशी लागत नाहीत. जगासमोर मिरवणारी नाती खूप असतात पण मनाला समजून घेणारी सगळीच नसतात. पैशाने भरलेल्या झोळीने माणूस कधीच सुखी होऊ शकत नाही तो सुखी होतो नात्यांनी भरलेल्या झोळीने. विचार आपणच करायचा आहे, आपणाला कोणती झोळी हवी आहे आणि आपण आपल्या भावी पिढीला कोणती झोळी द्यायची आहे.

नाती असावीत स्नेहाच्या धाग्यात गुंफलेली, भर उन्हात गार वाऱ्याची झुळूक देणारी, इंद्रधनुष्याच्या रंगात रंगणारी..

....अमर
2

( मराठी चित्रपट ) प्रेमाची गोष्ट : मला नाही भावला!




आज जवळ जवळ १० महिन्यांनंतर ब्लॉग लिहितोय. बरच काही घडलं या कालावधित. त्यातिल काही किस्से नक्कीच शेअर करेन. पण आज ब्लॉग लिहायला घेतलाय तो नुकताच बघितलेल्या मराठी चित्रपटावर. सध्या मराठी चित्रपटांना सुगिचे दिवस आलेले दिसताहेत. "हिरवं कुंकु(?), माहेरचा शालू" वगैरे टिपिकल चित्रपटांना बाजूला सारून नविन धाटणिचे चित्रपट प्रदर्शित होताना पाहून नक्कीच चांगलं वाटतयं. काहींनी तर राष्ट्रिय पातळीवरिल पुरस्कार देखिल पटकवले आहेत. जिथे क्वचितच एखादा मराठी चित्रपट दिसायचा असा वर्तमानपत्राचा चित्रपट विभाग आजकाल मराठी चित्रपटांनी गच्च भरलेला दिसतो. खरच या गोष्टी सुखावणार्‍या आहेत.

मध्यंतरी फ़ेसबुकवर अतुल कुलकर्णी असल्याचे समजले. तसा मला आवडणार्‍या अभिनेत्यांपैकी एक. लागलीच त्यांना सब्स्क्राईब झालो. काही दिवसातच त्यांच्या अकाऊंटवर सतत " प्रेमाची गोष्ट" या शब्दाचा वापर वाढलेला दिसू लागला. पहिल्यांदा मला ते एखादं नाटक असावं किंवा टिपिकल मराठी सिरियल असेल असे वाटले पण जेव्हा अतुलजींनी हा फोटो अपलोड केला तेव्हा कल्पना आली की हा मराठी चित्रपट दिसतोय. त्यानंतर त्यांच्या अकाऊंटवर केवळ याच चित्रपटाची पब्लिसिटी होती. लवकरच प्रदर्शितही झाला. पहिल्यांदा जेव्हा हा पोस्टर पाहिला तेव्हा ती नायिका कोणीतरी नविन वाटली पण जेव्हा समजलं की ती घाटगे कन्या आहे तेव्हा पहिले तर विश्वासच बसला नाही. कारण "चक दे" मधला तिचा चेहरा आणि या चेहर्‍यात खुप फरक वाटला.

चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर तर विचारायलाच नको इतक्या लोकांच्या कमेंट्स अतुलजींच्या अकाऊंटवर बरसू लागल्या. इतक्या छान छान कमेंट्स वाचून लवकरच चित्रपट सहपरिवार पाहायच निश्चित केलं. त्यात राजवाडेंचे दिग्दर्शन म्हणजे "सोनेपे सुहागा"च असणार असा एक विश्वास वाटू लागला. एवढ कौतुक ऐकल्यानंतर आपोआपच माझ्या आपेक्षा खुपच वाढल्या. "मुंबई-पुणे-मुंबई" ने माझं मन जिंकलेलं त्यामुळे राजवाडेंचा हा चित्रपटही तसाच हिट असणार अशी एक आशा वाटू लागली. नेहमीप्रमाणे "घरगुती" कारणांमुळे चित्रपट पहायला सवड मिळालीच नाही. शेवटी "TV वर येइल तेव्हा पाहू" अशी स्वतःची समजुत काढून घेतली आणि खरच खुपच लवकर हा चित्रपट TV वर दाखवला गेला. गेल्याच आठवड्यात स्टार प्रवाहवर दाखवला गेला. (तो स्टार प्रवाहवर दाखवला जाणारे हे देखिल मला अतुलजींच्या अकाऊंटवरूनच कळालं :D ). मॉंसाहेबांच्या  डेली सोपच्या टाईट शेड्युलमधून कसा बसा वेळ काढला आणि सहपरिवार चित्रपट पाहायला बसलो.

आधीच आपेक्षा एवढ्या उंचावल्यामुळे सुरुवातीपासूनच नाविन्य शोधत होतो. कदाचित नविन कहितरी बघायला मिळणार हिच मानसिकता तयार झालेली. राजवाडेंच्या बाबतीतली एक गोष्ट मला खुप आवडली ती म्हणजे "सिंप्लीसिटी". कोणताही भव्यदिव्य सेट नाही, विनाकारण न पेलणारे खर्च नाहीत. फक्त पुर्ण फोकस चित्रपटातील पात्रांवर! सुरूवात बरी वाटत असतानाच घाटगे बाईंची एंट्री झाली. पोस्टर नक्कीच फोटोशॉप एडिट केले असणार याची क्षणात खात्री पटली कारण मुळात मला या बाईंचा चेहरा कधी "नायिका" म्हणून आवडला नाही. आसतिल या दिसायला सुंदर पण मला कधीच सुंदर वाटल्या नाहीत. तेवढ्यात या बाईंचा पहिला डायलॉग कानावर पडला. अरररर..........! चेहरा ठिक आहे पण कसला आवाज आणि कसलं मराठी. पुर्ण निराशा झाली. या बाईंना साधं नीट मराठीही बोलता येत नाही आणि आवाजात काही चढे-उतारही नाही. एखाद्या नाटकात काम करत असल्यासारखा यांचा अभिनय. एकिकडे अतुलजी. एक परफ़ेक्ट अभिनेता. सुरुवातीपासूनच ते त्यांच्या "कॅरेक्टर"मधे इन्हाल्व्ह झालेले दिसले. आवाजात योग्य चढ-उतार, अचुक क्रिया-प्रतिक्रिया या त्यांच्या अभिनयाने समाधान वाटले.

अनपेक्षितपणे राजवाडेंची एंट्री देखिल छान वाटली. असंभव मधिल त्यांचा अभिनय पाहिला होता त्यामुळे चांगल्या अभिनयाची आपेक्षा होती  आणि सपोर्टिंग रोल असुनही त्यांनी ती योग्य पद्धतीने पुर्ण केली. चित्रपट जसजसा पुढ जात होता तस तसा मला घाटगे बाई जास्तच खुपु लागल्या. सारखे मनात विचार यायला लागले की याच मिळालेल्या काय राजवाडेंना? त्यांच्या जागी कितीतरी चांगल्या नायिका मराठी फिल्म इंडस्ट्रिमधे आहेत. कदाचित मुक्ता बर्वे देखिल चालल्या असत्या किंवा गिरिजा ओक देखिल नक्कीच घाटगे बाईंपेक्षा त्यांच्या रोलला जास्त न्याय मिळवून देऊ शकल्या असत्या. असो. तसच सहन करत मी चित्रपट पाहात होतो. एकदोन गाणी कानाला श्रवणिय वाटली पण मेंदूपर्यंत गेली नाहीत. "कधी तु, का कळेना" इत्यादी गाणी थेट मेंदूपर्यंत गेली तशी ही गाणी खास वाटली नाहीत.

चित्रपटात अतुल कुलकर्णी हे कथालेखक दाखविले आहेत. त्यात त्यांचा एक डायलॉग काहीसा या आशयाचा आहे की "चित्रपट असा असावा की प्रेक्षक त्यात गुंतुन जाईल. पुढे काय होणार याची उत्सुकता राहिल" पण हेच मला या चित्रपटात खटकलं. मुळात ते लिहित असलेली कथाच या चित्रपटाची कथा असल्याने लागलीच पुढे काय होणार याचा सहज अंदाज बांधता येत होता. तरी कथेला "ट्विस्ट" द्यायचे प्रयत्न चांगले वाटले. संपुर्ण चित्रपटात झालेले कॅमेरावर्क, एडिटींग, दिग्दर्शन नक्कीच आवडले. चित्रपटाची "पिक्चर कॉलिटी" देखिल उत्कृष्ट आहे. चित्रपटातील इतर सहाय्यक कलाकारांचे अभिनयही उत्कृष्ट वाटले आणि त्यांच्या त्या सुंदर अभिनयामुळे घाटगे बाईंचा अभिनय मला जास्तच साधारण वाटू लागला.

ओव्हर ऑल पाहता चित्रपट ठिक वाटला. जेवढं कौतुक मी चित्रपट पाहायच्या आधी ऐकलेलं, वाचलेलं त्यामानाने तर अजिबातच हा चित्रपट मला भावला नाही. मला कल्पना आहे की अगदी क्वचितच लोक माझ्या मताशी सहमत असतिल  पण राजवाडेंच्याकडून मला कदाचित जरा जास्तच आपेक्षा असतात.

असो! मी या चित्रपटाला रेटिंग देईन: ३/५

1

पुस्तक परिचय स्पर्धा २०१२ - माहिती व नियमावली



'मीमराठी.नेट'(mimarathi.net) वर आंतरजालावरील हौशी लेखकांना प्रोत्साहित करण्यासाठी नवनवीन योजना राबवल्या जातात. यापूर्वी 'ललित लेखन स्पर्धा', 'लघुकथा स्पर्धा' तसेच 'कविता स्पर्धा' यांचे यशस्वी आयोजन करण्यात आले होते. या सर्व स्पर्धांना आंतरजालावरील हौशी लेखकांकडून भरघोस प्रतिसाद मिळाला होता त्याबद्दल 'मीमराठी.नेट' सर्वांचा ऋणी आहे.
या वर्षी पुण्यातील अग्रगण्य पुस्तकांचे वितरक असलेल्या 'रसिक साहित्य प्रा. लि.'च्या व 'मीमराठी'यांच्या सहयोगाने "पुस्तक परिचय स्पर्धा २०१२" आयोजित करण्यात येत आहे. वाचन संस्कृती वृद्धिंगत व्हावी, नवनवीन साहित्याचा परिचय व्हावा हा उद्देश प्रामुख्याने समोर ठेवूनच पुस्तक परिचय स्पर्धेचे आयोजन करीत आहोत.
सदर स्पर्धा अठरा ते पन्नास या वयोगटातील लेखकांसाठी खुली आहे. स्पर्धेसाठी 'ललित लेख', 'कवितासंग्रह', 'कथासंग्रह', 'कादंबरी' या पैकी एका प्रकारातील सन १९९० ते २०१० मध्ये प्रकाशित झालेल्या मराठी पुस्तकाचा परिचय सादर करावयाचा आहे. प्रवेशिका म्हणून सादर केला जाणारा लेख कमाल दोन हजार (२०००) शब्दांचा असावा. स्पर्धा १ ऑगस्ट २०१२ सकाळी ९ वा. खुली होईल व प्रवेशिका घेण्याची सुरवात होईल. सर्व प्रवेशिका mimarathi.net वरील 'पुस्तक परिचय स्पर्धा' विभागात ऑनलाईन पद्धतीने किंवा ऑफलाईन पद्धतीने (पोस्टाने/कुरिअरने) द्यायच्या आहेत. (mimarathi.net) येथे सदस्यत्व घेण्यासाठी तसेच लेखन करण्यासंबंधी मदतीसाठी info@mimarathi.net यांच्याशी ई-मेल द्वारे किंवा ९७३००२७७०१ या क्रमांकवर संपर्क साधावा. प्रवेशिका ३१ ऑगस्ट २०१२, रात्री १२ वाजेपर्यंत सादर करता येतील.

नियमावली

१. स्पर्धेसाठी कोणतेही प्रवेश मूल्य नाही. दिनांक १ ऑगस्ट २०१२ रोजी अठरा (१८) वर्षांहुन अधिक तसेच पन्नास (५०) वर्षांहुन कमी वय असलेल्या सर्वांसाठी ती खुली आहे.
२. स्पर्धेत भाग घेण्यासाठी आपले स्वत:चे लेखन प्रवेशिका म्हणून देणे आवश्यक आहे.
३. लेखनाचा प्रकार हा 'पुस्तक परिचय' असा ठेवण्यात आला आहे. परिचय लेखनासाठी मराठी भाषेतील सन १९९० ते २०१० कालखंडामध्ये प्रकाशित झालेले कोणतेही पुस्तक निवडता येईल. परिचयासाठी निवडलेले पुस्तक खालीलपैकी एका साहित्यप्रकारातील असावे.

ललित लेख
कथासंग्रह (लघुकथा/दीर्घकथा)
कादंबरी
काव्यसंग्रह

प्रवेशिका म्हणून सादर केला जाणारा लेख कमाल दोन हजार (२०००) शब्दांचा असावा.
४. या स्पर्धेसाठी प्रवेशिका दोन प्रकारे सादर करता येतील.
अ. पहिल्या प्रकारात प्रवेशिका ऑनलाईन पद्धतीने mimarathi.net येथे थेट सादर करता येतील. टंकलेखन सहाय्यक म्हणून गमभन (www.gamabhana.com) किंवा बराहा / गुगल आयएमई चा अथवा कोणत्याही युनिकोड देवनागरी फॉन्ट्सच्या सहाय्याने टंकलिखित करून mimarathi.net येथे सादर करता येतील.
ब. ऑफलाईन पद्धतीने सादर करण्यासाठी टंकलिखित (हस्तलिखित प्रवेशिका ग्राह्य धरली जाणार नाही) प्रवेशिका खालील पत्त्यावर पोस्टाने/कुरिअरने स्पर्धेच्या अंतिम तारखेपूर्वी पोचतील अश्या प्रकारे पाठवण्यात याव्यात. पोस्ट अथवा कुरियर सेवेतील दिरंगाईमुळे प्रवेशिका उशीरा पोहोचल्यास सदर प्रवेशिका ग्राह्य धरली जाणार नाही. तसेच त्याबाबात कोणताही पत्रव्यवहार अथवा खुलासे देण्यास स्पर्धा आयोजक बांधील असणार नाहीत. तसेच सादर केलेली प्रवेशिका कोणत्याही परिस्थितीत परत केली जाणार नाही. सबब सर्व स्पर्धकांना विनंती की त्यांनी प्रवेशिकेची एक प्रत आपल्यापाशी ठेवावी.
पत्ता: -
‘पुस्तक परिचय स्पर्धा २०१२’रसिक साहित्य प्रा. लि.
६८३, बुधवार पेठ,
अप्पा बळवंत चौक,
पुणे – ४११ ००२
५. आंतरजालावर mimarathi.net अथवा अन्यत्र पूर्वप्रकाशित लेखन स्पर्धेसाठी सादर करावयाचे असल्यास स्पर्धा विभागात नव्याने प्रसिद्ध करावे लागेल. मुद्रित माध्यमात आधीच प्रसिद्ध झालेले लिखाण प्रवेशिका म्हणून ग्राह्य धरले जाणार नाही. ६. स्पर्धेत सहभागी होणार्‍या प्रत्येक व्यक्तीने खालील तपशील 'competition2012@mimarathi.net' या ईमेल पत्त्यावर ताबडतोब कळवणे आवश्यक आहे.

लेखकाचे मूळ नाव (टोपणनावाने प्रवेशिका सादर केली असली तरी स्पर्धेच्या निकालात मूळ नावाची घोषणा केली जाईल.)
प्रवेशिकेचा mimarathi.net वरील दुवा (लिंक)
संपर्क क्र., विरोप पत्ता (ई-मेल)
ब्लॉग पत्ता अथवा वैयक्तिक संकेतस्थळाचा (वेबसाईट) चा पत्ता (असल्यास)
पत्रव्यवहारासाठी पत्ता (अनिवासी भारतीयांनी भारतातील पर्यायी पत्त्ता देणे आवश्यक).


७. एखादी प्रवेशिका स्वीकारण्याचा वा नाकारण्याचा हक्क स्पर्धेचे आयोजक राखून ठेवत आहेत. तसेच स्पर्धेसाठी सादर केलेली प्रवेशिका कोणत्याही कारणास्तव मागे घेता येणार नाही.
८. अपेक्षेहून अधिक प्रवेशिका आल्यास अंतिम तारखे आधीच प्रवेशिका घेणे थांबवण्याचा हक्क स्पर्धा आयोजक राखून ठेवत आहे.
९. प्रवेशिका म्हणून सादर केलेल्या लेखनामध्ये शुद्धलेखनाचा किमान दर्जा राखणे ही स्पर्धकाची जबाबदारी आहे याची कृपया नोंद घ्यावी.
१०. सर्व प्रवेशिकाचे परिक्षण साहित्यिक क्षेत्रातील मान्यवर व्यक्ती करतील. परिक्षकांची नावे यथावकाश जाहीर केली जातील.
११. स्पर्धेचा निकाल स्पर्धा संपल्यानंतर सुमारे तीन आठवड्यानंतर जाहीर केला जाईल, जो mimarathi.net या संकेतस्थळावर तसेच निवडक मुद्रित वितरणातून जाहीर केला जाईल.
१२. निकालाबाबत स्पर्धा आयोजकांनी नियुक्त केलेल्या परिक्षकांचा निर्णय अंतिम राहील. यासंबंधी कोणतेही खुलासे देण्यास वा पत्रव्यवहार करण्यास स्पर्धा आयोजक, 'रसिक साहित्य' तसेच mimarathi.net बांधील नाहीत याची कृपया नोंद घ्यावी.
१३. स्पर्धेतील प्रत्येक साहित्य प्रकारामधील पहिल्या तीन विजेत्यांना पारितोषिके देण्यात येतील. याशिवाय स्पर्धेला मिळणार्‍या प्रतिसादावरून व अन्य लेखनाच्या दर्जानुसार स्पर्धेतील सर्व साहित्य प्रकार मिळून पाच उत्तेजनार्थ पारितोषिके देण्यात येतील.
१४. पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम अंदाजे ऑक्टोबर २०१२च्या पहिल्या सप्ताहात आयोजित केला जाईल. कार्यक्रमाचा तपशील यथावकाश जाहीर केला जाईल.
१५. स्पर्धेच्या लेखनाचे संकलन प्रकाशित करण्याचा अधिकार आयोजक राखून ठेवत आहेत. स्पर्धेसाठी प्रवेशिका सादर करण्याचा निर्णय घेतानाच स्पर्धकाने आपली प्रवेशिका अशा संकलनात प्रकाशित करण्याचा अधिकार आयोजकांना दिल्याचे मान्य केले आहे असे समजण्यात येईल. सदर प्रवेशिकेबाबत याशिवाय कोणताही अधिकार अथवा जबाबदारी पूर्णपणे स्पर्धकाची राहील याची कृपया नोंद घ्यावी.
१६. सदर स्पर्धेची जाहिरात विविध माध्यमातून प्रसारित करण्यात येणार आहे. अनेक हितचिंतकांना सदर माहिती अधिकाधिक लोकांपर्यंत पोचवण्याची विनंती करण्यात आली आहे. या विविध माध्यमातून प्रसिद्धीदरम्यान सदर माहिती मधे होणार्‍या सहेतुक/निर्हेतुक बदलांशी आयोजक सहमत असतीलच असे नाही. mimarathi.net येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या स्पर्धा सूचनेच्या धाग्यावरील मसुदा अंतिम मानण्यात येईल.
~●๋•ηινє∂ιтα ραтιℓ ●๋•
▐ ■ αттιтυ∂є ιѕ α ℓιттℓє тнιηg тнαт мαкєѕ α вιg ∂郃єяєη¢є■▐

Powered by Blogger.

आम्हीं जगभर