0

असच काहितरी....!

 ( पुर्वप्रकाशित: असच काहितरी....!   )      

                     आज सकाळी सलूनमधे  जाण्याचा योग आला. मांसाहेबांच्या आग्रहास्तव जावे लागले. :D . नेहमीचाच नाव्ही. "या साहेब. बसा!" असे आदबिने स्वागत झाले. नेहमीच म्हणजे अगदी लहान असल्यापासून त्याच्याच दुकानात जायचो. त्याने सांगितलेल्या खुर्चीवर जाऊन बसलो. त्याची तयारी सुरू झाली. तेवढ्यात एक गृहस्थ आपल्या छोट्या मुलासोबत दुकानात आले. नेहमी प्रमाणे त्या नाव्ह्याने त्यांचेही "या साहेब बसा. अरे वा आज छोटेसाहेबपण आलेत. छान छान. बसा!" असे स्वागत केले.

                         ते गृहस्थ माझ्या शेजारच्या खुर्चीवर बसले आणि त्यांच्या पलिकडच्या खुर्चीवर छोटेसाहेब बसले. तेवढ्यात त्या नाव्ह्याने कपाटावरचा स्टूल काढला आणि त्या छोट्या साहेबांना खुर्चीवरून उचलून खाली ठेवले. मग तो स्टूल त्या खुर्चीवर ठेवला आणि मग छोट्यासाहेबांना त्यावर बसवले. त्यामागचा हेतू हाच की नाव्ह्याला काम करताना उंची योग्य मिळावी.

                      क्षणात मला माझं लहानपण आठवलं. लहान असताना मी ही बाबांसोबत कटींगला जायचो. याच नाव्ह्याच्या दुकानात. तेव्हाही माझं "छोटे साहेब" असच स्वागत व्हायच. कोणीतरी आपल्याला "साहेब" म्हणतयं  मग ते "छोटे" का असेना पण "साहेब" म्हणतय हे ऐकुन खूप मस्त वाटायचं. :D आपोआपच मग माझ वागणं एखाद्या साहेबासारखं व्हायचं.  आधिच "साहेब" म्हटल्यामुळं मुठभर मांस वाढलेलं असायच पण तेवढ्यात तो नाव्ही हातात स्टुल घेऊन येताना दिसला की भयानक राग यायच. माहित नाही का? पण भयानक राग यायचा. खुर्चीवर स्टुल आणि स्टुलवर मी बसायच? साहेबानं बसायच तेही स्टुलावर? :-o अपमान! घोर अपमान वाटायचा. माझे बाबा पण "साहेब" आहेत! मग ते तेवढे खुर्चीवर डायरेक्ट बसणार आणि मला तेवढं स्टुलावर का? असा काहिसा विचार यायचा. पण काय करणार? आमचं थोडच काही चालायचं? कितीही इच्छा नसली तरी तो नाव्ही मला "उचलून" त्या स्टुलावर बसवायचाच! :D मग एक नाव्ही बाबांची कटिंग सुरू करायचा. बाबा त्याला काहिश्या सुचना करायचे, "हे असं काप, इथे जरा केस ठेव, वगैरे वगैरे" मग माझा नाव्ही बाबांनाच माझ्या कटींगबद्दल विचारायचा आणि बाबा म्हणायचे, "काही नाही, एकदम बारिक कर!". :-o परत अपमान! घोर अपमान! बाबा त्यांच्या नाव्ह्याला तेवढे  सुचना करणार  आणि माझ्या नाव्ह्याला काहिच नाही?? पण हे आमचं सगळं मनातल्या मनात. :))

                           माझी कटिंग लवकर संपायची. मग मी बाकड्यावर जाऊन बसायचो. बाबांची कटिंग अजून सुरूच असायची. मग नाव्ही काय काय करतो ते मी न्याहाळत बसायचो. बाबांची कटिंग झाली की मग बाबांची दाढी असायची. तो नाव्ही ब्रशने त्यांच्या गालावर फेस करायचा. ते बघुन खुप मजा यायची. तो नाव्ही ब्रश बाबांच्या गालावरून असा काही फिरवायचा की वाटायचं की एखाद मोरपिसच फिरतय! बाबांना गुदगुल्या होत नसतिल का? किंवा किती मज्जा वाटत असेल बाबांना  किंवा कसं वाटत असेल गालावर फेस लावल्यावर? वगैरे सतराशे साठ असले काहितरी प्रश्न मनात यायचे. :))  मग मनात विचार यायचा, "आपण कधी मोठे होणार? आपण कधी स्वतः नाव्ह्याला सुचना करणार? आपल्या गालावर कधी फेस लागणार?" :-/

                    तेवढ्यात नाव्ह्याने पाण्याचा स्प्रे डोक्यावर मारला आणि मी भानावर आलो. मग त्यानेच विचारलं "साहेब काय करू? मेडियम की बारिक? दाढी करायचिये का?" वगैरे, वगैरे! हम्म्म...! आता झालो मोठा. आता मला विचारलं जातं. आता मी स्टुलावर नाही तर डायरेक्ट खुर्चीवर बसतो. आता माझ्याही गालावर फेस केला जातो. पण खरच लहानपणच बरं होत. कशाची काही चिंता नाही. दाढीची कटकट नाही . बाबांच्या सोबत बिनधास्त जायचं. वेगळच "सेक्युर" वाटायचं.

                        कधी कधी असच काहितरी सुचतं. म्हटलं बघाव ब्लॉगवर टाकून आणखी किती जणांना असं वाटायचं..... :D बालिश जरी असलं तरी मला वाटतं आपल्या सगळ्यांत एक छोटं मुल नक्कीच कोठेतरी दडलेलं असतं जे असले काहितरी विचार डोक्यात आणत असतं! मला खात्री आहे की कधिना कधी माझ्यासारखच तुम्हालाही वाटलं असणारच! काय मग? बरोबर आहे ना? ;)

-अद्वैत उमेश कुलकर्णी
मराठी कॉर्नर
8

परत येशील का???

प्रिय कल्पि,

तुला हे पत्र लिहितेय खंर... पण तुला ते मिळेल का नाही माहित नाही...

कारण तू अचानक कुठेतरी दूर निघून गेलास... सगळे म्हणतात कि माझा भाऊ देवाघरी गेला... मला नाही खंर वाटत... आता तुच सांग सगळ्यांना कि तू इथेच आहेस म्हणून... पटकन या पोस्ट वर कमेंट कर आणि सगळ्यांना चकित कर...

तूच म्हणत होतास ना अजून एक गेट- टुगेदर करूयात.. कोकणात जाऊयात...
चल की.. तू म्हणशील तिथे जाऊ... खूप मजा येते तू सोबत असताना.. तू, भरत आणि गण्या.... आपल्या ग्रुप च हिट त्रिकुट...

मी तर तुला एकदाच भेटले प्रत्यक्ष.. नुकत्याच झालेल्या आपल्या सारसबाग भेटीत... पण बझ्झ अगदी नवीन होत तेव्हाची आपली ओळख.. रोज.. अगदी रोज.. आपली नेट भेट ठरलेली..

अगदी बॉसचा ओरडा खाल्ला इथपासून आज मी नवीन ड्रेस घातलाय इथपर्यंत सगळ काही मी बझ्झ वर टाकायची.. आणि कुणाचा रिप्लाय येवो न येवो.. तुझा नक्की यायचा...

आपण कसे एकत्र आलो आता आठवत नाही.. पण बझ्झ वरचा तू माझा पहिला मित्र होतास.. ग्रुप मधल्या इतर कोणाच्याही आधीपासून...

आपल्या ग्रुप मध्ये कोणाशीही कसलाही वाद वैगेरे न झालेला.. प्रत्येक वेळी पडती बाजू घेणारा.. कोणाचीही खोडी वैगेरे न काढणारा असा माझा सगळ्यात लाडका भाऊ... अगदी आपल्या ग्रुप मधल्या मुलींच्या बझ्झ वर काहीही वेडेवाकडे लिहिणार्याला चांगला इंगा दाखवण्यापासून ते बझ्झ वर झालेल्या एका वादातून मला सावरणारा तूच होतास...

आठवतंय तुला.. आपल बझ्झ मराठी मित्र मंडळ स्थापन झालं त्याचा पहिला अध्यक्ष तूच होतास.. आणि आपल्या मंडळांच चिन्ह म्हणून ती धारधार भवानी तलवार निवडणारा तूच...

आपल्या ग्रुप मध्ये सगळ्यांना एकत्र आणणारही तूच होतास आणि भेटूयात भेटूयात असं म्हणून पुढाकार घेणारही तूच... तुझ्यासोबत तुझ्या ब्लॉगलाही पोरकं करून गेलास...

आज पुन्हा पुन्हा आपल्या त्या भेटीचा वृतांत वाचते आहे.. घाई गडबडीत सुद्धा एकाचाही उल्लेख करण्यात तू चुकला नाहीस.. आणि आता पुन्हा आपली भेट होईल त्याच्या वृत्तांत सुद्धा..

गर्द कोवळ्या मनाची हा कुठे श्वास कोंडला!

काळोखाच्या उंबऱ्यात का जीव असा सोडला!!
धुंद विश्वात जगणे आतुर भेटी बहु पाहुणे!
काळोखी जणू मनुचीया हि सावज झाली मने!! धृ.!!

हृदयी प्रेमे, चेहरे अनामिक काळजात ठासले!
एकलाची जणू जीव जगी या जगण्यास फेकले!!
प्रश्नाच्या या जंजाळातून उत्तरे ना स्तवने!!१.!!
काळोखी जणू मनुचीया.....

तव धनुष्या टोकावरची धार पुनः बोथटली!
सप्त रंगांच्या आयुष्यात हि काळरात्र पसरली!!
मन हे आतुर, वेडे फिरुनी लक्ष जाळी हि हवने!!२.!!
काळोखी जणू मनुचीया.....

रात्र दिव्यांची, दिन अंधारी तुटते रे आतडे!
गर्दीत जणू चिरडले रे दुखी-व्याधीत कातडे!!
पाषाणाच्या प्रेमापोटी खंडित हृदय अन मने!!३.!!
काळोखी जणू मनुचीया.....

संसाराचा हा रे पसारा क्षणभंगुर न वाटे!
दुख एकीचे वाटुनी सगळे शंका मनी का दाटे!!
विश्वासाचा धागा तोडूनी नाती न जोडणे!!४.!!
काळोखी जणू मनुचीया.....

कास लक्ष्मीची, आर्त भुकेची पापांची माऊली!
ओसाड पडती मग पुण्ये हि फोडती रे टाहोळी!!
अश्रूंच्या त्या हिंदोळ्यावर आटती हि स्पंदने!!५.!!
काळोखी जणू मनुचीया.....
-


हि अशी कशी कविता?? इतकं कसलं दु:ख होत तुला??

इतकं टोकाला जाण्यापूर्वी आमच्यापैकी कोणाचीच आठवण नाही झाली का रे तुला?? एकदाही??

सगळ्यांची दु:ख आणि प्रॉब्लेम्स वाटून घेतलेस ना रे तू?? मग तुला काही खुपत होत तर आम्हाला का नाही बोललास? तुझ्या मनातल मळभ... आम्हाला त्यापासून दूर का ठेवलंस? आम्ही तच मध्ये नव्हतो तुझ्या पूर्णवेळ.. कबूल आहे.. पण तू एक फोन केला असतास तर आम्ही नसतो का रे बोललो तुझ्याशी? नसत ऐकून घेतल तुझं?? मी तुझ्याशी हल्ली बोलले नव्हते.. कारण परीक्षेच्या गडबडीत शक्यच नाही झालं रे... त्याची एवढी मोठी शिक्षा देणार का रे तू तुझ्या लहान बहिणीला..??

मी बहिण ना तुझी? मग तुझी बहिण आज तुला गळ घालतेय.. जिथे असशील तिथून परत ये.. आमचे कान धरायला... पुन्हा एकदा गेट टुगेदर करायचं ना?? मी कोकण एक्स्प्रेस ची तिकीट काढतेय... सगळ्यांची.. या वेळी नक्की सगळे येतील.. अगदी सगळे.. कोणीही टांग देणार नाही.. शप्पत... तू म्हणशील तिथे जाऊ.. तू म्हणशील तिथे राहू.. फक्त एकदाच ये रे... एकदाच...

मी वाट बघतेय तुझ्या येण्याची.. येशील ना??
4

दिवस आज सोनियाचा

दिवस आज सोनियाचा, साक्षीदार हा महासंगमाचा !




हाती सजला रंग तुझ्या मेहंदीचा,
 पायी पैंजण सोन्याचा!









हिरव्या बांगड्यांनी धरला फेर,
हिरव्या साडीचा हा घेर!







लाजुनी हसू येई चकोर,
सप्तपदीच्या वेळीचा सौम्य तो फेर!!





मंडवळ्या वरमाळांनी सजला हा सोहळा!










सनई चौघड्यांचा सुरात वसे लग्नाचा जिव्हाळा







 खूप खूप शुभेच्छा तुला शुभ घडी लाभली या मंडळा





मराठी बझ्झ मंडळातर्फे आणि बझ्झवाडीची चावडीतर्फे विनिता कुलकर्णीस आणि चैतन्य जोगदेव यांस लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा.
Powered by Blogger.

आम्हीं जगभर