1

नाती



नाती ....
 किती सोपे शब्द आहेत नाती! पण आपले जीवन अपूर्ण आहे या शब्दांशिवाय. दिवसातून म्हणण्यापेक्षा प्रत्येक तासाला आपण हेच शब्द जगात असतो. आपल्या जन्मापासून जी सुरुवात होते ती आपले जीवन संपले तरी हा शब्द आपली पाठ सोडत नाही. पण आता खरंच विचार करण्याची वेळ आली आहे, आपण खरंच जगतो का हा शब्द? काहींचे म्हणण्यापेक्षा सर्वांचे उत्तर हो हेच असणार आहे. कारण आपण या शब्दअगोदर खूप शब्द जोडले आहेत आणि या शब्दांच्या खेळात आपण आपल्या मनाचे समाधान करत असतो. उदा. मैत्रीचे नाते, विश्वासाचे नाते.. इ.
    प्रत्येकाने आपल्या परस्पर सोयीने नाती या शब्दाची व्याख्या केली आहे आणि आपण तीच जगत आहोत. पहा आठवून ३०-४० वर्षांपूर्वी आपण कधी मैत्रीचे नाते, विश्वासाचे नाते असे रोज बोलत होतो का? तर नाही. आई, पप्पा, बहीण, भाऊ, आजी, आजोबा कितीतरी नाती आपणाला आपल्या समाजाने दिली आहेत त्यांनाच आपण नातलग म्हणत असू, आणि याच नात्यातून निर्माण होणाऱ्या नवीन नात्यानं आपण दूरचे नातलग म्हणत असू आणि म्हणतो हि. आता या युगात हीच  नाती आपल्यात फार राहिली नाहीत आणि ती पोकळी भरून काढण्यासाठी आपण आपल्या सोयीप्रमाणे नवीन नाती निर्माण केलीत. का आली आपल्यावर हि परिस्थिती?
    आजच्या धावपळीच्या युगात आपल्याजवळ जर कशाची कमी असेल तर ती आहे वेळेची. आपण इतके पैशाच्या मागे वाहवत गेलो आहोत कि त्याच्यापुढे सर्व नातीगोती आपण विसरत आहोत. मग आपणाला केव्हा आठवतात आपले नातलग?
जर कोणाला देवाज्ञा झाली कि आपणाला सर्व म्हणजे जवळचे आणि दूरचे असी सगळेच आठवतात.
सुखाच्या वेळी फक्त काही जवळचे आणि मैत्रीचे नातलग आठवतात.
आणि ज्यांना आपण सख्खे म्हणतो म्हणजे भाऊ, बहीण हे फक्त आणि फक्त प्रॉपर्टीच्या हव्यासापोटी आठवतात. आणखी यांची गरज पडते ती लग्न जमवताना. यांचा संदर्भ नाही दिला तर समोरचे राहू दे  आपण तरी ठेवू का त्या माणसांच्यावर विश्वास?

आजकालच्या शहरातील आणि काही गावाकडील मुलांनासुद्धा प्रश्न पडतात मावशी म्हणजे काय? मामा कोण असतो? चुलत भाव, मावस भाव , इ ..हि वेळ आपणावर कोणी आणली? याला सर्वस्वी आपणच जबाबदार आहोत कारण प्रॉपर्टीच्या, पैशाच्या हव्यासापोटी आपणच हे नाती तोडली आहेत आणि तोडत आहोत. पैश्यापेक्षा नात्यांना किंमत देणे महत्वाचे आहे पैसे येतील आणि जातील पण तुटलेली नाती जोडता येत नाहीत. पैश्याने नाती विकत घेता येत नाहीत पण नात्यांनी पैसे उभे केले जाऊ शकतात. थोडक्यात काय तर हरवलेल्या वस्तू पुन्हा विकत घेता येतात पण आयुष्यात हरवलेली नाती पुन्हा हाताशी लागत नाहीत. जगासमोर मिरवणारी नाती खूप असतात पण मनाला समजून घेणारी सगळीच नसतात. पैशाने भरलेल्या झोळीने माणूस कधीच सुखी होऊ शकत नाही तो सुखी होतो नात्यांनी भरलेल्या झोळीने. विचार आपणच करायचा आहे, आपणाला कोणती झोळी हवी आहे आणि आपण आपल्या भावी पिढीला कोणती झोळी द्यायची आहे.

नाती असावीत स्नेहाच्या धाग्यात गुंफलेली, भर उन्हात गार वाऱ्याची झुळूक देणारी, इंद्रधनुष्याच्या रंगात रंगणारी..

....अमर
Powered by Blogger.

आम्हीं जगभर