'मीमराठी.नेट'(mimarathi.net) वर आंतरजालावरील हौशी लेखकांना प्रोत्साहित करण्यासाठी नवनवीन योजना राबवल्या जातात. यापूर्वी 'ललित लेखन स्पर्धा', 'लघुकथा स्पर्धा' तसेच 'कविता स्पर्धा' यांचे यशस्वी आयोजन करण्यात आले होते. या सर्व स्पर्धांना आंतरजालावरील हौशी लेखकांकडून भरघोस प्रतिसाद मिळाला होता त्याबद्दल 'मीमराठी.नेट' सर्वांचा ऋणी आहे.
या वर्षी पुण्यातील अग्रगण्य पुस्तकांचे वितरक असलेल्या 'रसिक साहित्य प्रा. लि.'च्या व 'मीमराठी'यांच्या सहयोगाने "पुस्तक परिचय स्पर्धा २०१२" आयोजित करण्यात येत आहे. वाचन संस्कृती वृद्धिंगत व्हावी, नवनवीन साहित्याचा परिचय व्हावा हा उद्देश प्रामुख्याने समोर ठेवूनच पुस्तक परिचय स्पर्धेचे आयोजन करीत आहोत.
सदर स्पर्धा अठरा ते पन्नास या वयोगटातील लेखकांसाठी खुली आहे. स्पर्धेसाठी 'ललित लेख', 'कवितासंग्रह', 'कथासंग्रह', 'कादंबरी' या पैकी एका प्रकारातील सन १९९० ते २०१० मध्ये प्रकाशित झालेल्या मराठी पुस्तकाचा परिचय सादर करावयाचा आहे. प्रवेशिका म्हणून सादर केला जाणारा लेख कमाल दोन हजार (२०००) शब्दांचा असावा. स्पर्धा १ ऑगस्ट २०१२ सकाळी ९ वा. खुली होईल व प्रवेशिका घेण्याची सुरवात होईल. सर्व प्रवेशिका mimarathi.net वरील 'पुस्तक परिचय स्पर्धा' विभागात ऑनलाईन पद्धतीने किंवा ऑफलाईन पद्धतीने (पोस्टाने/कुरिअरने) द्यायच्या आहेत. (mimarathi.net) येथे सदस्यत्व घेण्यासाठी तसेच लेखन करण्यासंबंधी मदतीसाठी info@mimarathi.net यांच्याशी ई-मेल द्वारे किंवा ९७३००२७७०१ या क्रमांकवर संपर्क साधावा. प्रवेशिका ३१ ऑगस्ट २०१२, रात्री १२ वाजेपर्यंत सादर करता येतील.
नियमावली
१. स्पर्धेसाठी कोणतेही प्रवेश मूल्य नाही. दिनांक १ ऑगस्ट २०१२ रोजी अठरा (१८) वर्षांहुन अधिक तसेच पन्नास (५०) वर्षांहुन कमी वय असलेल्या सर्वांसाठी ती खुली आहे.
२. स्पर्धेत भाग घेण्यासाठी आपले स्वत:चे लेखन प्रवेशिका म्हणून देणे आवश्यक आहे.
३. लेखनाचा प्रकार हा 'पुस्तक परिचय' असा ठेवण्यात आला आहे. परिचय लेखनासाठी मराठी भाषेतील सन १९९० ते २०१० कालखंडामध्ये प्रकाशित झालेले कोणतेही पुस्तक निवडता येईल. परिचयासाठी निवडलेले पुस्तक खालीलपैकी एका साहित्यप्रकारातील असावे.
ललित लेख
कथासंग्रह (लघुकथा/दीर्घकथा)
कादंबरी
काव्यसंग्रह
प्रवेशिका म्हणून सादर केला जाणारा लेख कमाल दोन हजार (२०००) शब्दांचा असावा.
४. या स्पर्धेसाठी प्रवेशिका दोन प्रकारे सादर करता येतील.
अ. पहिल्या प्रकारात प्रवेशिका ऑनलाईन पद्धतीने mimarathi.net येथे थेट सादर करता येतील. टंकलेखन सहाय्यक म्हणून गमभन (www.gamabhana.com) किंवा बराहा / गुगल आयएमई चा अथवा कोणत्याही युनिकोड देवनागरी फॉन्ट्सच्या सहाय्याने टंकलिखित करून mimarathi.net येथे सादर करता येतील.
ब. ऑफलाईन पद्धतीने सादर करण्यासाठी टंकलिखित (हस्तलिखित प्रवेशिका ग्राह्य धरली जाणार नाही) प्रवेशिका खालील पत्त्यावर पोस्टाने/कुरिअरने स्पर्धेच्या अंतिम तारखेपूर्वी पोचतील अश्या प्रकारे पाठवण्यात याव्यात. पोस्ट अथवा कुरियर सेवेतील दिरंगाईमुळे प्रवेशिका उशीरा पोहोचल्यास सदर प्रवेशिका ग्राह्य धरली जाणार नाही. तसेच त्याबाबात कोणताही पत्रव्यवहार अथवा खुलासे देण्यास स्पर्धा आयोजक बांधील असणार नाहीत. तसेच सादर केलेली प्रवेशिका कोणत्याही परिस्थितीत परत केली जाणार नाही. सबब सर्व स्पर्धकांना विनंती की त्यांनी प्रवेशिकेची एक प्रत आपल्यापाशी ठेवावी.
पत्ता: -
‘पुस्तक परिचय स्पर्धा २०१२’रसिक साहित्य प्रा. लि.
६८३, बुधवार पेठ,
अप्पा बळवंत चौक,
पुणे – ४११ ००२
५. आंतरजालावर mimarathi.net अथवा अन्यत्र पूर्वप्रकाशित लेखन स्पर्धेसाठी सादर करावयाचे असल्यास स्पर्धा विभागात नव्याने प्रसिद्ध करावे लागेल. मुद्रित माध्यमात आधीच प्रसिद्ध झालेले लिखाण प्रवेशिका म्हणून ग्राह्य धरले जाणार नाही. ६. स्पर्धेत सहभागी होणार्या प्रत्येक व्यक्तीने खालील तपशील 'competition2012@mimarathi.net' या ईमेल पत्त्यावर ताबडतोब कळवणे आवश्यक आहे.
लेखकाचे मूळ नाव (टोपणनावाने प्रवेशिका सादर केली असली तरी स्पर्धेच्या निकालात मूळ नावाची घोषणा केली जाईल.)
प्रवेशिकेचा mimarathi.net वरील दुवा (लिंक)
संपर्क क्र., विरोप पत्ता (ई-मेल)
ब्लॉग पत्ता अथवा वैयक्तिक संकेतस्थळाचा (वेबसाईट) चा पत्ता (असल्यास)
पत्रव्यवहारासाठी पत्ता (अनिवासी भारतीयांनी भारतातील पर्यायी पत्त्ता देणे आवश्यक).
७. एखादी प्रवेशिका स्वीकारण्याचा वा नाकारण्याचा हक्क स्पर्धेचे आयोजक राखून ठेवत आहेत. तसेच स्पर्धेसाठी सादर केलेली प्रवेशिका कोणत्याही कारणास्तव मागे घेता येणार नाही.
८. अपेक्षेहून अधिक प्रवेशिका आल्यास अंतिम तारखे आधीच प्रवेशिका घेणे थांबवण्याचा हक्क स्पर्धा आयोजक राखून ठेवत आहे.
९. प्रवेशिका म्हणून सादर केलेल्या लेखनामध्ये शुद्धलेखनाचा किमान दर्जा राखणे ही स्पर्धकाची जबाबदारी आहे याची कृपया नोंद घ्यावी.
१०. सर्व प्रवेशिकाचे परिक्षण साहित्यिक क्षेत्रातील मान्यवर व्यक्ती करतील. परिक्षकांची नावे यथावकाश जाहीर केली जातील.
११. स्पर्धेचा निकाल स्पर्धा संपल्यानंतर सुमारे तीन आठवड्यानंतर जाहीर केला जाईल, जो mimarathi.net या संकेतस्थळावर तसेच निवडक मुद्रित वितरणातून जाहीर केला जाईल.
१२. निकालाबाबत स्पर्धा आयोजकांनी नियुक्त केलेल्या परिक्षकांचा निर्णय अंतिम राहील. यासंबंधी कोणतेही खुलासे देण्यास वा पत्रव्यवहार करण्यास स्पर्धा आयोजक, 'रसिक साहित्य' तसेच mimarathi.net बांधील नाहीत याची कृपया नोंद घ्यावी.
१३. स्पर्धेतील प्रत्येक साहित्य प्रकारामधील पहिल्या तीन विजेत्यांना पारितोषिके देण्यात येतील. याशिवाय स्पर्धेला मिळणार्या प्रतिसादावरून व अन्य लेखनाच्या दर्जानुसार स्पर्धेतील सर्व साहित्य प्रकार मिळून पाच उत्तेजनार्थ पारितोषिके देण्यात येतील.
१४. पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम अंदाजे ऑक्टोबर २०१२च्या पहिल्या सप्ताहात आयोजित केला जाईल. कार्यक्रमाचा तपशील यथावकाश जाहीर केला जाईल.
१५. स्पर्धेच्या लेखनाचे संकलन प्रकाशित करण्याचा अधिकार आयोजक राखून ठेवत आहेत. स्पर्धेसाठी प्रवेशिका सादर करण्याचा निर्णय घेतानाच स्पर्धकाने आपली प्रवेशिका अशा संकलनात प्रकाशित करण्याचा अधिकार आयोजकांना दिल्याचे मान्य केले आहे असे समजण्यात येईल. सदर प्रवेशिकेबाबत याशिवाय कोणताही अधिकार अथवा जबाबदारी पूर्णपणे स्पर्धकाची राहील याची कृपया नोंद घ्यावी.
१६. सदर स्पर्धेची जाहिरात विविध माध्यमातून प्रसारित करण्यात येणार आहे. अनेक हितचिंतकांना सदर माहिती अधिकाधिक लोकांपर्यंत पोचवण्याची विनंती करण्यात आली आहे. या विविध माध्यमातून प्रसिद्धीदरम्यान सदर माहिती मधे होणार्या सहेतुक/निर्हेतुक बदलांशी आयोजक सहमत असतीलच असे नाही. mimarathi.net येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या स्पर्धा सूचनेच्या धाग्यावरील मसुदा अंतिम मानण्यात येईल.
~●๋•ηινє∂ιтα ραтιℓ ●๋•
▐ ■ αттιтυ∂є ιѕ α ℓιттℓє тнιηg тнαт мαкєѕ α вιg ∂郃єяєη¢є■▐