"ने मजसी ने परत मातृभूमीला, सागरा प्राण तळमळला," हे गीत रचून महासागराला साकडे घालणाऱ्या महान देशभक्त स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंती निमित्त त्यांना मनाचा मुजरा. २८ मे १८८३ साली दामोदरपंत आणि राधाबाई या दाम्पत्याच्या पोटी नाशिक जिल्ह्याच्या भूगुर गावी ची. विनायकचा ( आदरार्थी एकवचन) जन्म झाला. त्यांचे घराणे इनामदारांचे. घरी समृद्धी, म्हणजे ' देशभक्तीचे' फुकटचे श्राद्ध घेण्याची त्यांना अजिबात गरज नव्हती, पण देशभक्ती त्यांच्या नसानसांत भिनलेली होती. पारतंत्र्याची साल त्यांना शांत झोप देत नव्हती. ' मुलाचे पाय पाळण्यात दिसतात' म्हणजे स्वातंत्र्यवीरांचे असामान्यत्व त्यांच्या बालवयात दिसून आले. त्यांची बुद्धी शीघ्र व तल्लख, आकलनशक्ती जबरदस्त. ९/१० वर्षाचे असताना ते वृत्तपत्रीय वार्तांवर मित्र मंडळीत चर्चा करीत. लहानपणी त्यांची आई वारली. त्यांच्या वडिलांनी दुसरे लग्न न करता त्यांचे मातेच्या वात्सल्याने संगोपन केले. १८९७ साली वयाच्या १४ व्या वर्षी माध्यमिक शिक्षणासाठी ते नाशिकला आले. तेथील गणेश उत्सवातून त्यांनी देशभक्तीच्या चळवळीस प्रारंभ केला. त्याच साली चाफेकर बंधूना Rand ह्या गोऱ्या साहेबाच्या हत्येबद्दल फाशीची शिक्षा झाली. सावरकरांच्या मनात देशभक्तीचा अंगार फुलविण्यास हि गोष्ट विशेषत्वाने कारणीभूत ठरली. या प्रसंगानातर वयाच्या १५ व्या वर्षी कुलस्वामिनी पुढे ' सशस्त्र क्रांतीच्या मार्गाने भारतमातेला स्वतंत्र' करण्याची शपथ घेतली आणि १८९९ साली ' राष्ट्रभक्त समूह' आणि 'मित्रमेळा' नावाच्या क्रांतिकारी गुप्त संघटना काढल्या, तसेच शिवजयंती, गणेश उत्सव आदी अनेक कार्यक्रम सुरु करून सावरकरांनी नाशिकचे समाजजीवन भारून टाकले.
१९०४ साल हे वंग-भंग च्या चळवळीमुळे देशभर गाजले. तेव्हा संपूर्ण महाराष्ट्रा संतापून उठवला. त्यातूनच 'स्वदेशी' आणि 'बहिष्कार' या चळवळी उत्पन्न झाल्या. या चळवळीचा एक भाग म्हणून स्वातंत्र्यवीरांनी पुण्यामध्ये विलायती कपड्यांची ' सामुदाईक होळी' पेटविली. १९०६ साली लोकमान्य टिळकांचे साहाय्य घेऊन ते इंग्लंड ला गेले. तेथे ते श्यामजी कृष्णवर्मा यांच्या ' india house ' मध्ये उतरले. श्यामजी कृष्णवर्मा हे क्रांतिकारी विचारांचा पूरस्कार करणारे होते. त्या दृष्टीने india house ' हे इंग्लंड ला उच्च शिक्षणासाठी जाणाऱ्या भारतीय विद्यार्थांचे वसतिगृह होते. कृष्णवर्मा यांनी तेथे स्वातंत्र्यवाद्यांची 'homerule' नावाची एक संघटना काढली होती. थोड्याच काळात स्वा. सावरकर त्या संघटनेचे सूत्रधार बनले. 'homerule' च्या तरुणांना क्रांतीवादाची शिकवण देऊन स्वातंत्र्यवीरांनी त्यांना भारून टाकले. त्या काळी क्रांतीची प्रक्रिया सांगणारा ' Joseph Mazzini यांचे आत्मचरित्र व राजकारण' नावाचा लंडन मध्ये लिहिलेला सावरकरांचा ग्रंथ एव्हढा गाजला कि, सरकारला तो जप्त करावा लागला, पण त्यामुळे त्याचे महत्व आणखीनच वाढले.
१९०७ साली १८५७ च्या स्वातंत्र्य संग्रामाला ५० वर्षे पूर्ण झाली. ' शिपायाची भाऊगर्दी' आशा नावाने इंग्रज आणि त्यांच्या तालावर नाचणारे कातडीबचाऊ तथाकथित बुद्धीप्रामाण्यवादी- भारतीय विद्वान त्या स्वातंत्र्ययुद्धाला हिणवत होते. तो अपसमज दूर करण्यासाठी सावरकरांनी '१८५७ सालचे स्वातंत्र्यसमर' या नावाचे एक पुस्तक मराठीत लिहिले. एव्हढेच नव्हे तर लंडन मध्ये त्या स्वातंत्र्यसंग्रामाचा ५० व स्मृतीमहोत्सव मोठ्या थाटात साजरा केला. भारतात क्रांतीची चळवळ दडपून टाकण्यासाठी त्या काळात इंग्रज सरकारने अत्याचाराचे थैमान मांडले होते. राजद्रोहाच्या आरोपाखाली अनेक तरुणांना जन्मठेप व फाशीची शिक्षा ठोठावली जात होती. सावरकरांचे सहकारी मदनलाल धिंग्रा यांना १७ ऑगस्ट १९०९ रोजी फाशी देण्यात आली. त्याचा साली सावरकरांचे वडील बंधू बाबाराव सावरकर यांना 'राजाविरुद्ध बंड करणे' या आरोपाखाली अटक होऊन जन्मठेप - काळ्या पाण्याची शिक्षा देण्यात आली, तर लॉर्ड मिंटो याच्यावर बॉम्ब टाकल्याच्या कटात सामील असल्याच्या संशयावरून सावरकरांचे धाकटे बंधू डॉ. नारायणराव यांना अटक झाली. धिंग्रा प्रकरण थोडेसे शांत झाल्यावर स्वातंत्र्यवीरांनी प्रचारपत्रके, ग्रंथ, बॉम्ब बनविण्याची पत्रके व पिस्तुले भारतात पाठविण्याचा धडाका सुरु केला. भारतातील वातावरण सरकारी अत्याचारांनी तापले होते. आशा स्थितीत अनंत कान्हेरे यांना फाशीची शिक्षा झाली, पण ज्या पिस्तुलाने Jacson ची हत्या झाली ते पिस्तुल सावरकरांचे होते आस शोध लागताच ब्रिटीश सरकारने त्यांना अटक केली. या खटल्यात त्यांना ' दोन जन्मठेपींची' म्हणजे ५० वर्षाच्या काळ्यापाण्याची शिक्षा झाली. हे भवितव्य स्वातंत्र्यवीरांना आधीच कळून चुकले होते. त्यामुळे त्यांनी ब्रिटनच्या तुरुंगातून बाहेरच्या क्रांतिकारक सहकारयाना ' शेवटचा रामराम' नावाचे अनावृत्त पत्र लिहिले. त्यात ते म्हणतात, " मित्रानो ईश्वराने आपल्यापैकी प्रत्येकाची भूमिका आधीच ठरवून टाकली आहे. ईश्वराने नेमून दिलेली भूमिका वटवताना प्रसंगी जळत्या खडकांना बांधून, कोंडून पडावे लागेल, तर प्रसंगी क्रांतीच्या उसळत्या लाटांच्या शिखरावर स्वार होता येईल. जगन्नियत्याने कोणत्याही परिस्थितीत ठेवले तरी ती परिस्थिती सर्वोच्च आहे, असे समजून आपले जीवित कार्य पार पाडावे." यावरून स्वातंत्र्यवीरांची दुर्दम्य इच्छाशक्ती, प्रखर देशभक्ती, आशावाद, ईश्वरनिष्ठा व द्रष्ठेपणा आणि धीरोदात्त वृत्ती दिसून येते. ' पन्नास वर्षे' काळ्या पाण्याची सजा म्हणजे अंदामांहून जिवंत परत येणे नाही, असा ह्या शिक्षेचा अर्थ होता. त्यांना तिकडे नेण्याआधी त्यांची पत्नी साध्वी यमुनाबाई त्यांना भेटण्यास जाणून शेवटचे दर्शन घेण्यास गेल्या, तेव्हा सावरकर त्यांना म्हणाले, ' भव्यतम अर्थाने आपणही संसार थाटण्यात यशस्वी ठरलो आहोत. आपली चार चूल - बोळकी आपण फोडून टाकली, पण पुढे - मागे त्या योगे हजारो जणांच्या घरी क्वचित सोन्याचा धूर निघू शकेल.' स्वातंत्र्यवीरांचे हे शब्द, हि भविष्यवाणी आज तंतोतंत खरी ठरली आहे. त्यांनी ज्या मरणयातना भोगल्या, त्यामुळेच आपण आजचे स्वातंत्र्य उपभोगीत आहोत. स्वातंत्र्याचे मालक (राजकर्ते) बनलेल्या सत्ताधाऱ्यांच्या घरी खरोखरच सोन्याचा धूर निघत आहे, पण त्यासाठी सावरकर आणि स्वातंत्र्यासाठी हौतात्म्य पत्करलेल्या क्रांतीविरानी आपल्या सोन्यासारख्या संसाराची अक्षरश: होळी केली आहे. याची सतत जाणीव ठेवणे हीच त्या देश्भाक्ताना खरी श्रद्धांजली ठरणार आहे.
अंदमानच्या सिल्वर जेल मध्ये नरकयातना भोगत असताना 'कमले' सारखे नितांत सुंदर काव्य त्यांना स्फुरले. घायपात्याच्या काट्याने ते तुरुंगाच्या भिंतीवर काव्यचरण लिहून मुखोग्दत करीत. पुढे अंदमानात हि त्यांनी राजकैद्यांची एकी घडवून आणून राजकैद्याना काही सोयी सुधारणा मिळवून दिल्या. तिथले मुस्लीम कैदी हिंदू बांधवांना बाटवीत, तेही त्यांनी थांबवले. १९२४ च्या जानेवारीत सावरकरांची तुरुंगातून सशर्त मुक्तता करण्यात आली. त्यांना राजकीय काम करण्यास बंदी करण्यात आली, पण म्हणून ते स्वस्थ बसले नाहीत. त्यांनी समाजसुधारणेचे कार्य हाती घेतले. पतितपावन मंदिर बांधून ते अस्पृश्यांसह सर्वाना खुले केले. आणि रत्नागिरीच्या सार्वजनिक जीवनातून अस्पृश्यता व रोटीबंदी या प्रथांचे उच्चाटन केले. त्यांच्याच प्रेरणेने गोमंतकमधल्या ख्रिस्ती गावाड्याचे शुद्धीकरण केले गेले.
' हिंदुत्व हे भारताचे राष्ट्रीयत्व ' असे ते मनात. ' हिंदू राष्ट्राचा कर्णधार ' या नात्याने सावरकरांनी स्वत:चा असा स्वतंत्र कार्यक्रम आखून भागानगर व भागलपूरचे दोन नि:शस्त्र प्रतिकाराचे लढे दिले. त्यात ते संपूर्ण यशस्वी झाले. त्यामुळे महात्मा गांधीनी खास तर पाठवून धन्यवाद दिले, मात्र असहकार आणि नि:शस्त्र चळवळीच्या मार्गाने भारताला स्वतंत्र मिळेल, यावर त्यांचा अजिबात विश्वास नव्हता, म्हणून भारतीय तरुणांनी सैनिकी शिक्षण घेऊन शस्त्रसज्ज असले पाहिजे, असे त्यांचे ठाम मत होते. त्यासाठी त्यांनी आपल्या ' हिंदू ' महासभेच्या वतीने सैनिकीकरणाचा कार्यक्रम हाती घेतला. त्यासाठी भारतभर प्रचार केला सावरकरांचे सदभाग्य असे कि, त्यांना " याची देही याची डोळा" स्वातंत्र्य देवीचे दर्शन झाले. ( म्हणजे ते हयात असतानाच भारत स्वतंत्र झाला.)
स्वातंत्र्यवीर सावरकर हे केवळ देशभक्त नव्हते तर द्रष्टे समाजसुधारक हि होते. त्यांच्या ठाई अमोघ वकृत्व आणि महाकवीची प्रतिभा विलासात होती, तसेच आत्मचरित्रकार आणि नाटककार म्हणून त्यांनी आपला वेगळा ठसा उमटवला आहे. भाषा व लिपी शुद्धी यांचे ते अभिमानी होते, तसेच ते हिंदुत्वाचे, हिंदू राष्ट्रवादाचे कडवे पूरस्कर्ते होते, मात्र चातुवर्ण, जातीभेद, कर्मकांडे आणि अस्पृश्यता याला त्यांचा कडवा विरोध होता. या रूढी मुळे हिंदू धर्माचा नाश झाला. ' प्रत्यक्षनिष्ठ, प्रयोगक्षम, विज्ञानधर्म हाच सर्वश्रेष्ठ धर्म' असे ते म्हणत. " दोन शब्दात, दोन संस्कृती" या आपल्या निबंधात त्यांनी रूढी - अंधश्रद्धांवर कठोर प्रहर केले आहेत. मी वृत्तीने कवी आणि कलावंत आहे , पण मला परिस्थितीने राजकारणी पु रुष बनवले, असे ते म्हणत. वयाच्या आठव्या वर्षी त्यांनी कवितेची धूळपाटी हातात घेतली आणि तेव्हापासून पुढे ४० वर्षे अव्याहतपणे त्यांनी काव्यलेखन केले. चळवळीच्या धकाधकीत आणि अंदमानातील यातनामय, उपेक्षित व एकाकी जीवनात त्यांना साथ के ली ती कवितेने! जगण्याचे लढण्याचे बळ दिले ते कवितेने!
http://vicharmoti.blogspot.com/ येथे पूर्व प्रकाशित. जसा च्या तसा देत आहे.
4 comments:
स्वातंत्र्य वीर सावरकरांना लक्ष लक्ष प्रणाम...!!!
त्यांच्यासारखा कोटीप्रभ असा स्वातंत्र्यसूर्य या भारतभूमीवर पुन्हा होणे नाही...
ह्या अतिशय अभ्यास पूर्ण लेखा बद्दल मनःपूर्वक धन्यवाद.
खरे तर पृथ्वीतलावर अशी फार थोडी माणसं असतात/आहेत जी काळाच्या अगोदर जन्माला येतात.स्वातंत्र्यवीर त्या पैकीच एक. सावरकरांनी स्वातंत्र्य पूर्व नि स्वातंत्र्योत्तर, देशभक्ती नि देशप्रेमा पोटी ज्या काही सुचना नि जे काही इशारे तत्कालीन नेहरू सरकारला देऊन ठेवले होते नि त्या सरकारने सुद्धा त्यावेळी स्वातंत्र्य मिळाल्याच्या नादात,आनंदात जे साफ धुडकावून लाऊन सावरकरांना "साठी बुद्धी नाठी "असे हिणविले होते ते बघितले कि आजच्या काळात सुद्धा आपल्याला थक्क व्हायला होते नि आपण आश्चर्याच्या धक्क्यातून सावरू शकत नाही.नमुन्यां दाखल फक्त काहीच उदाहरणे देतो
सावरकरांचे हे इशारे भारताला १९४७ साली स्वातंत्र्य मिळाल्या नंतर कॉंग्रेसचे नेहरूंच्या नेत्तृत्वा खाली जे पहिले सरकार आले होते त्याला उद्देशून होते हे कृपया लक्षात घ्यावे/ठेवावे.
१) नेहरूंनी जो काश्मीर प्रश्न सरदार पटेलांना (तत्कालीन गृह मंत्री नि उप पंतप्रधान ) सोडवून न देता लोंबकळत ठेवला त्यावर दिलेला इशारा :
तुम्ही भावनेच्या आहारी जाऊन केवळ हट्टीपणाने हा प्रश्न तुमच्या अखत्यारीत ठेवून तो लोंबकळत ठेवलाय पण ह्याची तुम्हाला नव्हे तर देशाला स्वातंत्र्यानंतर २५ वर्षांनी किमत मोजावी लागेल.५० वर्षा नंतर तर ह्या प्रश्नाने उग्र स्वरूप धारण करून तो अधिक जटिल झालेला असेल.
मोजावी लागलेली किंमत ... पाक बरोबरचे १९६६-१९७१ व १९९९-२००० चे कारगिल युद्ध.
२) अहिंसावादी धोरण म्हणजे स्वसंरक्षण सिद्धते मध्ये दुर्लक्ष करून त्या वर खर्च न करणे नव्हे.भारताला सध्याचा मित्रराष्ट्र म्हणून समजल्या जाणाऱ्यां चीन कडून हि भविष्यात धोका उदभवू शकतो.
मोजावी लागलेली किंमत ... १९६२ चे भारत -चीन युद्ध.
३) इंग्रजांनी सुरु केलेल्या जाती जमातीच्या नावाच्या सैनिकांच्या सर्व पलटणी कालबाह्य ठरवून त्या स्वतंत्र भारताच्या एकाच झेंड्या खाली आणा,तसेच केवळ शूर लढवय्ये म्हणून मिलिटरी मध्ये फक्त कोणत्याही एकाच जातीच्या सैनिकांची संख्या अवाजवी होऊ देऊ नका.भविष्यात ते संख्येच्या आधारावर शिरजोर होऊ शकतात.
मोजावी लागलेली किंमत ... शिखांची स्वतंत्र खलिस्तानची मागणी नि इंदिरा गांधींच्या हत्येच्या रूपाने त्याची मोजावी लागलेली किंमत.
४) दुर्गम नि एका कोपऱ्यात म्हणून ईशान्य भारता कडे दुर्लक्ष करू नका भविष्यात धोका उदभवू शकतो.
मोजावी लागत असलेली किंमत ... बोडो, नागा आंदोलने नि सदैव अशांतता नि १९६२ च्या युद्धात चीन कडून देशाची बदललेली सीमारेषा.
५)देशातील २० वर्षाच्या प्रत्येक नागरिकास स्त्री-पुरुषास मग ती कोणत्याही जाती धर्म पंथाची असेल… त्यास किमान २ वर्षाचे सक्तीचे मिलिटरी ट्रेनिंग कायद्याने घेणे भाग करा.
मोजावी लागलेली किंमत ... २६/११ च्या वेळी ह्याच्या अभावा मुळे पोलिसांवर अवाजवी पडलेला ताण नि झालेली जीवितहानी.
ही फक्त काही नमुन्यां दाखल दिलेली उदाहरणे आहेत.सावरकरांनी अशी नि ह्या प्रकारची सुमारे ५० (इशारे) भाकिते केली होती/आहेत .पण ते काळाच्या खूप आधी असल्याने त्यांना हेटाळणीला सामोरे जावे लागले होते आणि आता तर काय जाती पातीच्या राजकारणा मुळे ते विस्मृतीत सुद्धा गेले आहेत,नि राज्यकर्त्यांनी आता तर त्यांचे अंदमानातील स्मारक सुद्धा पार उखडून टाकलंय.त्या मुळे तर काही बोलायलाच नको.मणिशंकर अय्यरांचा "सावरकर नि जिना हे फाळणीला जबाबदार होते" हा जावई शोध म्हणजे तर कहरच आहे.नि कदाचित सावरकरांचे जानवे आड आल्याने,महाराष्ट्र सरकार सुद्धा मूग गिळून गप्प बसले.असो लिहावे तेवढे थोडेच आहे.पण आपला लेख वाचल्यावर राहवले नाही.आपल्या ब्लॉगची जागा परवानगी शिवाय वापरल्या बद्दल निवेदिता नि बझ्झवाडीची सर्व टीम मला मोठ्या मनाने माफ करेल अशी आशा आहे.
ताजा कलम
मी कोणत्याही पक्षाचा,संघटनेचा,संस्थेचा अधिकृत,अनधिकृत वा अगदी छुपा देखील सभासद नसून वरील कॉमेंट ही केवळ एक पुणेकर म्हणून सावरकरां विषयी आज पर्यंत जे जे काही थोडेफार वाचनात आले नि मनाला भावले त्याचे निखळ नि निव्वळ प्रतिबिंब आहे.
निवेदिता जाता जाता फक्त एक गोष्ट निदर्शनास आणू इच्छितो सावरकरांचे जन्म वर्ष १८३३ नसून १८८३ आहे. कृपया ती दुरुस्ती करावी ही विनंती.
धन्यवाद.
Post a Comment