आपल्या देशात प्रत्येक क्षेत्राच्या प्रगती मध्ये मराठी माणसाचे योगदान खूप ,मोलाचे आहेत.स्वातंत्र्य लढया पासून, खेळ, सामाजिक, राजकीय तसेच कलाक्षेत्रात; कला क्षेत्रातून आठवल.... मराठी रंग भूमी वरील अजरामर नाव म्हणजेच बालगंधर्व आपल्या गायन व अभिनयाने मराठी रंगभूमी ला जगात एक वेगळे स्थान निर्माण करून देणाऱ्या अश्या प्रतिभावान कलावंताची १२० वी जयंती २६ जून या दिवशी आहे .
नारायण श्रीपाद राजहंस म्हणजेच बालगंधर्व यांचा जन्म सांगली जिल्ह्यातील पुलूस तालुक्यात नागठाणे या गावी झाला. वयाच्या १० व्या वर्षी त्यांचे गाणे ऐकून लोकमान्य टिळकांनी त्यांना बालगंधर्व हि उपाधी दिली. हे बालगंधर्व विशेषण नारायणराव राजहंस यांना आयुष्यभर चिकटले, नव्हे त्यांचे मूळ नाव मागे पडून केवळ बालगंधर्व एवढेच त्यांचे नाव प्रचलित झाले.
बालगंधर्व या नावाने अधिक लोकप्रिय असलेले विसाव्या शतकाच्या सुरवातीच्या काळातील मराठी रंगभूमी आणि चित्रपटांतील अभिनेते, गायक आणि नाट्यनिर्माते. रंगभूमीवर स्त्रिया अपवादानेच अभिनय करीत असतानाच्या काळात आपल्या हुबेहुब रंगवलेल्या स्त्री-भूमिकांमुळे बालगंधर्वांनी मोठी लोकप्रियता मिळवली. नाट्यगीतांसह ख्याल, ठुमरी, गझल, दादरा, भक्तिगीते यांसारख्या गायन प्रकारांवरही त्यांचे विलक्षण प्रभुत्व होते. बालगंधर्व पं भास्करबुवा बखले यांचे शिष्य आणि मास्तर कृष्णरावांचे गुरुबंधू होत.
बालगंधर्वांची रंगभूमीवरील कारकीर्द किर्लोस्कर संगीत मंडळी या नाट्यसंस्थेत १९०५ मध्ये झाली. मात्र तिचे एक भागीदार नानासाहेब जोगळेकर यांच्या १९११ मध्ये निधनानंतर संस्थेत वाद झाले. परिणामी १९१३ मध्ये बालगंधर्वांनी गणेश गोविंद (गणपतराव) बोडस आणि गोविंदराव टेंबे यांच्यासह ती संस्था सोडली आणि गंधर्व संगीत मंडळीची स्थापना केली, अन मग मराठी रंगमंचावर अवतरले ते नाट्यकलेचे सुवर्णयुग. संगीतसौभद्र, शाकुंतल, संशयकल्लोळ, मानापमान, विद्याहरण, एकच प्याला, स्वयंवर अश्या अनेक संगीत नाटका मध्ये बालगंधर्वांनी आपल्या संगीताची आणि अभिनयाची सर्वदूर पसरवली. त्यांच्या शाकुंतल या नाटकात शकुंतला हे पात्र आणि मानापमान या नाटकातील भामिनी च्या भूमिकेमुळे ते खूप प्रसिद्ध झाले. नाट्य संगीत ,अभिनय, नैपथ्य या सर्व गोष्टीत ते पारंगत होते. स्रियांच्या वेषातून पुरुष अशा नजाकतीने वावरायचा की, सौंदर्यवती महिलाही त्यांचे अनुकरण करायच्या. शब्दाचा घाट, त्याचा लाडिकपणा, त्याची अचूक फेक यातून बालगंधर्वांच्या दर्शनाएवढेच बोलणेही प्रसन्न व्हायचे. पुढे बोल पटांचा जमाना चालू झाल्यावर बालगंधर्वांनी प्रभात फिल्म कंपनीसाठी ‘धर्मात्मा’ चित्रपटात संत एकनाथांची भूमिकाही केली.
त्यांच्या कलाक्षेत्रातील अतुल्य योगदान पाहून भारत सरकारने त्यांना १९५५ साली राष्ट्रपती पदक देऊन सन्मानित केलं. तसेच १९६४ साली पद्मभूषण या पुरस्काराने त्यांना सन्मानित करून त्यांच्या कार्याचा गौरव केला. तसेच त्यांनी २४ व्या मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्ष पद भूषविले. अश्या मनस्वी कलावंताने १५ जुलै १९६७ साली जीवनाच्या रंगमंचावरून कायमची निवृत्ती घेतली.
अशा या सव्यसाची कलावंताला कोटी कोटी प्रणाम अन् मनाचा मुजरा
संकल्पना व संकलन : निवेदिता पाटील
शब्दांकन : राजेंद्र सबने
माहिती स्त्रोत व छायाचित्र : आंतरजालावरून साभार
2 comments:
Post a Comment