गजरा - २माझी तीन नंबरची प्रेमा आत्या तिच्या किस्श्यांसाठी आम्हा सर्वात प्रसिद्ध. मनमुराद चुका करणे आणि त्या सगळ्यांना सांगता सांगता तेव्हढ्याच मनमोकळेपणाने हसणे हा तिच्या खेळकर स्वभावाचा एक पैलू.  तिनी कधी कुणा  लहान  मुलाला  धाक लावायचा प्रयत्न केल्याचं किंवा कुठल्या नातेवाईकात आवाज  चढवल्याचं स्मरणात नाही. सत्तरीजवळ आली असली तरी तिची निरागसता मात्र  ८  वर्षाच्या  मुलीसारखीच  टिकली  आहे.  

चंपाषष्ठी म्हणजे खंडोबाच्या नवरात्री घरी सगळेजण मिळून देवासाठी भरपूर हार करतात. त्यात विविध रंगसंगतीची अन सगळ्यात भारी हार बनवण्यात ही पटाईत, तर हिच्या हातची साटोरी  खायला  साक्षात  अन्नपूर्णा  रिझर्व्हेशन न करता लाल डब्ब्यातून येईल अशी  ही सुगरण.

उर्मिला मातोंडकरच लज्जा सिनेमा मधलं ’आईये आजाईये’ या गाण्यातला , ओ रा रा री री रा रा असा कोरस आहे ना, त्या कोरस ऐवजी आमची ही  आत्या ’उद्याला टीव्ही बघा’ असं  गायची. काहीतरी  काम  करता करता ती तंद्रीतच ’उद्याला टीव्ही बघा’ असे म्हणते आहे हे ऐकल्यावर आम्हा सगळ्या लोकांची तर 
हसून हसून मुरकुंडीच वळली.  अजूनही जर कधी हे गाणं माझ्या तोंडात बसलं तर मी ओ रा रा री री रा रा  कधीच गात नाही. किंबहुना कोरस मध्ये’उद्याला टीव्ही बघा’ हेच जास्त चपखल बसते असे माझे स्पष्ट मत  झाले  आहे. बघा तुम्हीही गाऊन बघा. :)


गेल्या आठवड्यात ती घरी आली होती तेव्हा सांगत होती,

"परवा शाळेत गेले होते.  शाळा  सोडल्याचा  दाखला आणायला.  पिऊनला सांगून तब्बल ५०  वर्षांपुर्वीचा दाखला काढून घेतला. त्याच्यानंतर घरी  परततच होते  तेव्हा  एक  मैत्रीण भेटली."

मैत्रीण म्हणाली, " अगं किती वर्षानी भेटत आहेस! इकडे कशी काय?"

त्यावर आत्याबाई तंद्रीतच  म्हणाल्या, " डेथ सर्टिफ़िकेट आणायला गेले होते."

मैत्रीणीने काळजीपुर्वक चेहरा करून विचारलं, "अस्सं? कोणाचं?"

आत्याबाईना अजूनही आपण स्कूल लिव्हिंग सर्टिफ़िकेट ऐवजी आपण  नक्की काय बोललो याची तंद्री नव्हती, ती म्हणाली, "माझंच की!"

मैत्रीण अजून सीरियस झाली आणि म्हणाली, "अगं काय बोलतीयेस! बरी आहेस ना? तुझं डेथ सर्टीफ़िकेट?"

तेव्हा कुठे तिला स्वत: केलेली गफ़लत लक्षात आली, आणि ’अगो बाई, काय बोलले मी!’ असा चेहरा करून  खळखळून हसू लागली. 

तिच्या खुमासदार शैलीत किस्सा ऐकवता ऐकवता तिच्या मनमुराद हास्यात मी सुद्धा कधी दाखल झालो समजलेच नाही . :) - पंत     

4 comments:

वाह... अशी माणसं इतरांच्याही जगण्यातली लज्जत वाढवतात... :)
 
जागण्याला अर्थ देणारी माणसे
 
इंद्रधनू - :)

रणांगण - :) जागण्याला?
अर्थ वगैरे कसला रे - त्यांच्या बरोबर दोन क्षण हसत जातात एवढेच?
 
इंद्रधनू - :)

रणांगण - :) जागण्याला?
अर्थ वगैरे कसला रे - त्यांच्या बरोबर दोन क्षण हसत जातात एवढेच?
 

Post a Comment

Powered by Blogger.

आम्हीं जगभर