।।खूब लड़ी मर्दानी वह तो झाँसी वाली रानी थी।।


जन्म व बालपण
                 दुसर्‍या बाजीराव पेशव्यांचे बंधु चिमाजी अप्पा यांचे व्यवस्थापक मोरोपंत तांबे व भागिरथीबाई या दाम्पत्याच्या पोटी कार्तिक वद्य १४, शके १७५७ म्हणजे इंग्रजी कालगणनेनुसार १९ नोव्हेंबर १८३५ ला लक्ष्मीबाई यांचा जन्म झाला. मोरोपंतांनी तिचे नाव “मनकणिका” असे ठेवले व प्रेमाने “मनुताई” असे संबोधित. मनुताई रूपाने देखणी व हुशार होती. मनुताई ३-४ वर्षांची असतांनाच तिच्यावर मातृवियोगाचे दु:ख कोसळले. शेवटच्या बाजीराव पेशव्याच्या बरोबरच लक्ष्मीबाईचे वडील मोरोपंत तांबे हे हि ब्राम्हवार्तास येऊन राहिले होते. त्यामुळे त्यांच्या या कन्येला, धोंडोपंत, रावसाहेब, तात्या टोपे आदी तिच्या समकालीन मंडळींबरोबर घोड्यावर बसणे, शस्त्र संचालन करणे आदी युद्धोपयोगी विद्या व कलांचे शिक्षण मिळालेले होते व अल्पवयातच ती निपुण बनली होती.
 वैवाहिक जीवन 
                     वयाच्या ७ व्या वर्षी शके १७६४ च्या वैशाखात म्हणजेच १८४२ साली मनुताई यांचा विवाह झाशी संस्थानचे अधिपति गंगाधरराव नेवाळकर यांच्याशी थाटामाटात पार पडला. मोरोपंत तांबे यांच्या मनुताई विवाहित होऊन झाशीची राणी म्हणून संबोधल्या जाऊ लागल्या. विवाहानंतर त्यांचे नाव 'लक्ष्मीबाई' असे ठेवण्यात आले. इ.१८५१ .मध्ये मार्गशीर्ष शु एकादशीला राणी लक्ष्मीबाई यांच्या पोटी एक पुत्ररत्‍न जन्मले. गादीला वारस मिळाला म्हणून गंगाधररावांना अत्यानंद झाला. तो तीन महिन्यांचा असतांनाच काळाने त्याच्यावर झडप घातली. त्यामुळे राणी लक्ष्मीबाई व गंगाधरराव यांना पुत्रवियोगाचे दु:ख सोसावे लागले.
पतिवियोगाचा धक्का आणि दत्तकविधान
                     मराठेशाहीत झाशीचे शासक हे पुण्याच्या पेशव्यांच्या अंकित राहणारे जहागीरदार होते. त्यांना राजा हा किताब मिळाला होता. सन १८१७ साली झाशीचे राजे रामचंद्रराव यांच्या बरोबर इंग्रजांनी मित्रत्वाचा तहनामा केला. त्यात झाशीचे राज्य वंशपरंपरेने रामचंद्ररावांच्या कुळातच ठेवले जाईल असे आश्वासन इंग्रज सरकार तर्फे देण्यात आले होते. पुत्रवियोगाचा धक्का सहन न झाल्याने प्रकृति खंगलेले गंगाधरराव काही महिन्यांतच संग्रहणीच्या विकारास बळी पडले. गंगाधररावांच्या इच्छेनुसार गादीला वारस म्हणून नेवाळकर घराण्याच्या वंशातील वासुदेव नेवाळकर यांचा मुलगा आनंदराव दत्तक घेऊन त्याचे नाव 'दामोदरराव' ठेवले. दत्तक विधि झाल्यानंतर २१ नोव्हेंबर १८५३ रोजी दुपारी गंगाधररावांना मृत्यूने गाठले. पतिवियोगाच्या माध्यमातून वयाच्या १८ व्या वर्षी राणी लक्ष्मीबाई यांच्यावर वैधव्याची कुर्‍हाड कोसळली. " एम्पायर इन इंडिया" नामक पुस्तकात लेखक मेजर इव्हान्स वेल यांनी हे नमूद केले आहे. कि - " दत्तक घेण्याचा संस्कार हिंदू धर्माश्स्त्रास अनुसरून यथोचित रीतीने करण्यात आला होता. त्यावेळी इंग्रज अधिकारीही तेथे उपस्थित होते. आपण दत्तक मुलगा घेतला आहे याची सूचना गंगाधरराव यांनी मरणापूर्वी इंग्रज सरकारला दिली होती. "
'मेरी झाशी नही दूँगी' 
                इतके सर्व असूनही १८५४ साली आपणास दत्तक नामंजूर असल्याचे Governor General Lord Dalhousie याने कळवले. ईतकेच करून तो थांबला नाही तर त्याने झाशीचे राज्य खालसा करून टाकले व झाशीचे जडजवाहर व सर्व संपत्ती जप्त करून खजिन्यात जमा केली. त्याच वेळी राणी लक्ष्मीबाईच्या मनात इंग्रजी शासनाबद्दल द्वेशाग्नी भडकून उठला. इंग्रजांचा नीचपणा आणखीही पुढे गेला होता; प्रजेच्या मनावर तिच्या संबंधीचा विलक्षण प्रभाव त्यांना नष्ट करायचा होता. त्यासाठी राणीच्या चारित्र्यावर शिंतोडे उडविण्यास त्यांनी प्रारंभ केला. पण राणीच्या चारित्र्याचा पूर्ण परिचय असलेल्या Major Malkam नामक एका विद्वान इंग्रजानेच परस्पर या आरोपाचे जोरदार खंडन केले. १६ मार्च १८५५ Governor General ला लिहिलेल्या सरकारी पत्रात त्याने नि: संदिग्ध भाषेत कळविले कि - " राणीचे चारित्र्य" अत्यंत उच्च प्रतीचे आहे आणि झाशीतील प्रत्येक मनुष्य तिच्याविषयीच्या आदराने भारावून गेलेला आहे." 
                 केवळ १८ वर्षाच्या कोवळ्या वयात विधवा झालेल्या या वीर महिलेने तिच्या हक्कावर, राज्यावर, संपत्तीवर व चारीत्र्यावरही इंग्रजांनी जो घोर अन्याय चालवला होता त्याखाली मान न वाकवता, त्याचा प्रतिकार करण्याचा अलौकिक धैर्य अंगी बाणवले. तिचं कर्तृत्वाचा काळ १८५४ ते १८५८ हा होता. तिच्या दिव्या गुणांच्या आविष्काराने दिपलेल्या इंग्रजानाही लाजेने मान खाली घालावी लागली. दत्तक नामंजूर करून झाशीचे राज्य व संपत्ती खालसा केल्यावर इंग्रजांनी राणी लक्ष्मीबाईला दरमहा रुपये ५००० /- पेन्शन देऊ केली, पण इंग्रजांनी फेकलेला हा भिकेचा तुकडा राणीने ठोकरीने उडवून लावला. " मै अपनी झाँसी नही दूंगी" असे तिने इंग्रज अधिकाऱ्यांना खडसावून सांगितले. राणीने झाशीला स्वत:ची संघटना उभारली. झाशीतील स्त्रियांना तिने स्वत: युद्धकलेचे प्रशिक्षण दिले. भावी स्वातंत्र्य युद्धासाठी प्रजेची माने तिने अनुकूल करून घेतली.
                                                        १८५७ चा संग्राम
                  १८५७ मधील जानेवारीत सुरू झालेल्या स्वातंत्र्य युद्धाने १० मे रोजी मीरत येथेही पेट घेतला. ४ जून १८५७ रोजी कानपूरला नानासाहेबांनी इंग्रजांविरुद्ध उठाव केला. त्याच दिवशी राणीनेही झाशीचे स्वातंत्र्य घोषित केले. १२ नंबरची इंग्रजांची फलटण तिला येऊन मिळाली. कानपूर प्रमाणे झाशिनेही इंग्रजांच्या खजिन्यावर, दारूखान्यावर, प्रथम ताबा मिळवला. दि. ७ जूनला राणीने झाशीच्या किल्ल्यावर हल्ला चढवून तो जिंकून घेतला. स्वातंत्र्याचा ध्वज उभारून त्याची सर्वत्र द्वाही फिरविण्यात आली कि, ' खल्क खुदा का, मुल्क बादशहा का और हुकम राणी लक्ष्मीबाई का' ८ जून १८५७ पासून २४ मार्च १८५८ पर्यंत झाशीवर राणी लक्ष्मीबाईचाच अधिकार नांदत होता. ती झाशिलाच पक्के ठाण मांडून बसली होती. झाशी हे मध्य बर्तातल्या सर्व क्रांतीवाद्यांचे केंद्र बनले. 
              त्यानंतर त्यांनी इंग्रजांच्या संभाव्य हल्ल्यातून झाशीचे रक्षण करण्याच्या दृष्टीने सिद्धता केली. इंग्रजांनी लक्ष्मीबाई यांना जिवंत पकडून आणण्यासाठी सर ह्यू रोज यांची नेमणूक केली. २० मार्च १८५८ रोजी सर ह्यू रोज यांच्या सैन्याने झाशीपासून ३ मैलांवर आपल्या सैन्याचा तळ ठोकला व लक्ष्मीबाई यांना शरणागति पत्करावी, असा निरोप पाठवला. राणी हे जाणून होती. तिनेही वेध लढवण्याची पूर्वतयारी केली होती. दिवस राणीची फौज लढत होती. तिच्या सैन्यात स्त्रियांचा भरणा होता. प्रसंगी तोफा चालविण्याचेहि काम त्यांनी केले. किल्ल्याला इंग्रज फौजांनी पडलेली भगदाडे त्या महिला फौजेने रात्रीत बुजवून टाकली.१८५७ च्या स्वातंत्र्य संग्रामात शेकडो वीर महिला आघाडीवर पुरुष योद्धयांच्याहि अग्रभागी तळपल्या. मोतीबाई नावाची एक स्त्री राणीच्या हेर खात्याची प्रमुख होती. ती धर्माने मुसलमान असून नाटकात स्त्री भूमिका करायची. एव्हढेच नव्हे तर सर्व प्रकारच्या बेमालूम भूमिका वठवायची. तो तिचं व्यवसाय होता. ती मुसलमान फकिराचा वेष बेमालूम वठवून शत्रूच्या गोटात प्रवेश करी व सर्वत्र संचार करून शत्रूकडील बातम्या काढून आणत असे. या कमी राणीला तिची मोलाची मदत मिळत होती. आपल्या गोटात स्वैर संचार करणारा व गोड गळ्याने सुस्वर गाणी म्हणणारा भिक्षेकरी फकीर म्हणजे एक स्त्री आहे आणि राणीच्या हेर खात्याची प्रमुख आहे हे इंग्रजांना कळलेच नाही. मोतीबाई फक्त नातीच नव्हती तर युद्धकलेतही निपुण होती. झाशीच्या वेढ्यातही वेळी महिलांच्या नगर रक्षक पाल्तानीची तीच सेनानी होती. 
                  मोतीबाई प्रमाणे राणीची दुसरी महत्वाची सरदार ललिताबाई बक्षी हि होती घोड्यावर स्वारी करण्यात ती निपुण होती झाशीच्या लढ्याच्या वेळी मोठ्या धाडसाने तटावरून किल्ल्यात चढून येणाचा प्रयत्न करणाऱ्या २ इंग्रज अधिकाऱ्यांना ललिता बक्षीने अश्वसंचालनात ती जितकी निपुण होती तितकीच तोफांची बिनचूक गोलंदाजी करण्यात हि तिचं हातखंडा होता. ललिता प्रमाणेच झलकारी हि एक राणीच्या विस्वसातली सेविका होती. "Lieutenant Bone" जेव्हा किल्ल्याच्या तटावर चढू लागला. तेव्हा मोठा धोंडा त्याच्यावर घालून झालकारीनेच त्याचा कपाळमोक्ष केला होता. लालीताप्रमाणेच तोफांची गोलंदाजी करण्यात निष्णात असलेली सुंदर नावाची एक दासी राणीजवळ होती. झाशीच्या वेढ्याच्या वेळी पुरुष गोलंदाज मारले गेल्यावर ललिता व सुंदर यांनीच तोफा चालवल्या. त्यांचे कर्तृत्व पाहून इंग्रज गोलंदाजांनी लज्जित होऊन आपले मोर्चे बदलले; म्हणून सर ह्यू रोजने फितुरीचा मार्ग अवलंबला. अखेर ३ एप्रिल रोजी सर ह्यू रोजच्या सैन्याने झाशीत प्रवेश केला. सैन्याने झाशीतील लोकांची लुटालूट करण्यास सुरुवात केली.
                राणी लक्ष्मीबाई प्रमाणे दिसणारी तिची काशी नावाची एक दासी होती. तीही शूर व धाडशी होती महिला होती. झाशीच वेढा लढविणे अशक्य झाल्याने वेढा फोडून काल्पीस निघून जाण्याचा राणीने निश्चय केला. प्रसंग आणीबाणीचा होता. इंग्रज शहरात घुसले होते . अशा प्रसंगी लढत - लढत जाण्याखेरीज मार्ग नव्हता. पण त्यामुळे राणी इंग्रजांच्या हाती लागण्याची शक्यता होती अशा प्रसंगी राणीसारख्याच दिसणाऱ्या काशीने राणीचा पोशाख केला व काही स्वार बरोबर घेऊन घोडा दौडवीत ती तटाच्या बाहेर पडली. ‘अरे, हि पहा राणी चालली' असे म्हणून इंग्रज फौज तिच्यावर तुटून पडली. या संधीचा फायदा घेऊन खरी राणी सध्या पोशाखात आपल्या निवडक आणि विश्वासू स्वारांसह किल्ल्याबाहेर निघाली. या दरम्यान वडील मोरोपंत त्यांच्या समवेत होते. फळी तोडून बाहेर जातांना इंग्रजांच्या फौजांबरोबर झालेल्या हातघाईच्या लढाईत ते घायाळ झाले. इंग्रजांनी त्यांना पकडले आणि फाशी दिले परंतु राणी दूर निघून गेली व तितक्यात काशिनेही त्यांना झुकांडी दिली व ती अगदी वेगाने घोडा दौडवीत लवकरच काल्पीच्या रस्त्यावर आपल्या परमप्रिय स्वमिनीच्या तुकडीत येवून मिळाली. 
काल्पीची झुंज 
                   झाशी सोडून राणी एका दिवसात १०८ मैलाची मजल मारून काल्पीला पोहोचली झाशीच हा १२ दिवसांचा संग्राम युद्ध इतिहासात सुवर्ण अक्षरात लिहिला आहे. राणी झाशीहून निघून गेलेली पाहून सर ह्यु रोज काल्पीवर चालून गेला व ती स्वताच आपली फौज घेवून रोज वर चालून गेली काल्पी पासून ४२ मैलावर कांचागावत तिने इंग्रजी फौजेला गाठले. घनघोर लढाई झाली. पण तिला हवी तशी मदत ना मिळाल्यामुळे शेवटी पराभव पत्करावा लागला. पण पुन्हा फौज सुसंघटीत करून ती काल्पीला परतली आता तर सर ह्यु ने काल्पिवरच आक्रमण केले. तेव्हाही लक्ष्मीबाईच पुन्हा त्याच्याशी लढली. इंग्रजांची उजवी बाजू पार मोडून पडली त्यामुळे इंग्रज गोलंदाज तोफा सोडून पळाले. क्रांतीवाद्यांच्या फौजेत सुव्यवस्था, स्वामीनिष्ठा, नसल्याने शेवटी काल्पी इंग्रजांच्या हाती गेले. 
               काल्पी येथे पराभूत झालेले रावसाहेब पेशवे, बांद्याचे नबाब, तात्या टोपे, झाशीची राणी आणि प्रमुख सरदार गोपाळपूर येथे एकत्र जमले. लक्ष्मीबाई यांनी ग्वाल्हेर हस्तगत करण्याची सूचना केली. ग्वाल्हेरचे शिंदे अजूनही ब्रिटिशधार्जिणे होते. राणी लक्ष्मीबाई यांनी पुढे होऊन ग्वाल्हेर जिंकून पेशव्यांच्या हातात दिले. आता ग्वाल्हेर क्रांतीवाद्यांचे केंद्र बनले. १५ जून १८५८ रोजी सर ह्यु रोज ग्वाल्हेरवर चालून आला यावेळ राणीनेच रोजला प्रतिकार केला. त्यावेळी General स्मिथ रोज च्या सहाय्याला आला १५-१७ जून हे तीनही दिवस राणी इंग्रज फौजेवर तुटून पडली. ग्वाल्हेरवरील विजयाचे वृत्त सर ह्यू रोजला कळले होते. वेळेचा अपव्यय केल्यास आपली परिस्थिति अवघड होईल, हे त्याच्या लक्षात आले. त्याने आपल्या सैन्याचा मोर्चा ग्वाल्हेरकडे वळवला. १६ जून रोजी सर ह्यू रोज हा ग्वाल्हेरला भिडला. सर ह्यू रोज यांचा लक्ष्मीबाई व पेशवे यांनी मुकाबला करण्याचे ठरवले. ग्वाल्हेरच्या पूर्व बाजूचे रक्षण करण्याचे काम लक्ष्मीबाई यांनी स्वत:च्या अंगावर घेतले. लढाईत लक्ष्मीबाई यांचे अभूतपूर्व धैर्य पाहून सैनिकांना स्फूर्ति आली. त्यांच्या मुंदर आणि काशी या दासीसुद्धा पुरुषी वेषात लढाईसाठी आल्या. राणीच्या शौर्यामुळे इंग्रजांना त्या दिवशी माघार घ्यावी लागली. १८ जूनला राणी लक्ष्मीबाई यांच्या शौर्यामुळे हताश झालेल्या इंग्रजांनी ग्वाल्हेरवर सर्व बाजूंनी एकदम हल्ला केला. या वेळी त्यांनी शरणागति न पत्करता शत्रूची फळी फोडून बाहेर जाण्याचे ठरवले. राणी आता संपूर्ण घेरली गेली तिच्याजवळ १५-१६ च घोडेस्वार उरले होते. पण ती रणरागिणी इंग्रज सेनेला कापीत पुढे निघाली. फळी फोडून ती भरधाव निघाली तिच्या मागावर इंग्रज तुकडी निघाली त्याच्याशी राणीच्या चकमकी चालू झाल्या त्यात मुंदर कामी आली दोन्ही कडील मनुष्यबळ कमी होऊ लागले. फळी फोडून जात असतांना फुलबागेचा एक ओढा आडवा आला. राणी लक्ष्मीबाई यांच्याकडे नेहमीचा 'राजरत्‍न' घोडा नसल्याने दुसरा घोडा ओढ्यापाशीच गरगर फिरू लागला. राणी लक्ष्मीबाई यांनी आपले भवितव्य ओळखून चालून आलेल्या गोर्‍यांवर हल्ला केला. यात त्या रक्‍तबंबाळ होऊन घोड्यावरून खाली कोसळल्या. पुरुषी वेशात असल्यामुळे राणी लक्ष्मीबाई यांना इंग्रज स्वार ओळखू शकले नाहीत. त्या पडताच ते स्वार परत निघून गेले. राणी लक्ष्मीबाई यांच्या एकनिष्ठ सेवकांनी जवळच असलेल्या गंगादास यांच्या मठात नेऊन त्यांच्या मुखात गंगोदक घातले. आपल्या देहास म्लेंच्छांचा हात लागू नये, अशी इच्छा प्रदर्शित करून त्यांनी वीर मरण स्वीकारले.

                 जगभर पसरलेल्या क्रांतिकारकांना, सरदार भगतसिंग यांच्या संघटनेला आणि सरतेशेवटी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या सेनेला याच झाशीच्या राणी लक्ष्मीबाई यांच्या शौर्याने स्फूर्ति दिली. हिंदुस्थानच्या अनेक पिढ्यांना स्फूर्ति देत झाशीच्या राणी अवघ्या तेविसाव्या वर्षी स्वातंत्र्यसंग्रामात अमर झाल्या. अशा वीरांगना झाशीच्या राणी लक्ष्मीबाई यांच्या चरणी शतश: प्रणाम
झांशीवाली 
अवघ्या तेविसाव्या वर्षी रणांगणात हौतात्म्य पत्करणार्‍या झाशीच्या राणीचे चरित्र स्फूर्तीदायी आहे. १८५७ च्या संग्रामात आधी झाशी, नंतर काल्पी आणि शेवटी ग्वाल्हेर येथील लढायांमध्ये आपल्या असामान्य क्षात्रवृत्तीची चुणूक दाखवून तिने ब्रिटिशांना चकित केले. झाशीचा किल्ला घेण्यासाठी ब्रिटीश सेनापती सर ह्यू रोज याला शेवटी फितुरीचा आश्रय घ्यावा लागला. आपल्या पुत्राला पाठीशी बांधून लढाई करणारी अशी असामान्य स्त्री जगाच्या इतिहासात झाली नाही ! पहिल्या महायुद्धातील `गदर' पक्षाच्या देशभक्‍तांना, सरदार भगतसिंग यांच्या संघटनेला आणि स्वा. सावरकरांपासून सुभाषचंद्रांपर्यंत सर्व क्रांतीकारकांना स्फूर्ती देणार्‍या या रणचंडिकेचा पराक्रम व वीरमरण दैदिप्यमान आहे !! 

जेष्ठ कृष्ण सप्‍तमी रोजी राणी लक्ष्मीबाई यांचा बलीदानदिन असतो. कवी भा.रा. तांबे यांनी राणी लक्ष्मीबाई यांच्यावर केलेली कविता येथे देत आहोत.

हिंदबांधवा ! थांब या स्थळी अश्रु दोन ढाळी ।
ती पराक्रमाची ज्योत मावळे इथे झांशीवाली ।।
तांबेकुलवीरश्री ती
नेवाळकरांची कीर्ति
हिंदुभूध्वजा जणु जळती ।
मर्दानी राणी लक्ष्मीबाई मूर्त महाकाली ।
रे हिंदबांधवा ।।१।।

घोड्यावर खंद्या स्वार
हातात नंगि तलवार
खणखणा करित ती वार
गोर्‍यांची कोंडी फोडित पाडित वीर इथे आली
रे हिंद बांधवा ।।२।।

कडकडा कडाडे बिजली
इंग्रजी लष्करे थिजली
मग कीर्तिरूप ती उरली
ती हिंदभूमीच्या पराक्रमाची इतिश्रीच झाली
रे हिंद बांधवा ।।३।।

मिळतील इथे शाहीर
लववितील माना वीर
तरूझरे ढाळतील नीर
ह्या दगडा फुटतील जिभा
कथाया कथा सकळ काळी
रे हिंद बांधवा ।।४।।

कवी - भा.रा. तांबे (१९३९)

संकल्पना व शब्दांकन : निवेदिता पाटील आणि निखिल देशपांडे 



2 comments:

।।खूब लड़ी मर्दानी वह तो झाँसी वाली रानी थी।।

माझा शतश : प्रणाम ... !!!
 
Khoop mhanaje khoop bhaari!
 

Post a Comment

Powered by Blogger.

आम्हीं जगभर